
स्पेनचा 200 वर्ष जुना ‘कॅथोलिक फूड फाइट फेस्टिवल’ एलकांटे प्रांताच्या आयबीआय शहरात साजरा करण्यात आला. यावेळी लोकांनी एकमेंकावर सडलेली अंडी, पीठ, हर्बल रंग आणि फटाक्यांची राख फेकत फेस्टिवल साजरा केला. दरवर्षी 28 डिसेंबरला साजरा केला जाणारा हा सण प्रेम आणि मैत्रीपुर्ण लढाईचे प्रतिक आहे. ही लढाई सकाळी 8 वाजता सुरू झाली आणि दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू होती. या लढाईसाठी दोन गट पाडण्यात आले होते व यात महिलांनी देखील भाग घेतला होता.

दोन्ही गटांनी सैनिकी जवानासारखा गणवेश घातला होता. सणाची सुरूवात शहराच्या महापौरांनी केली. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेंकावर सडलेली अंडी, पीठ, हर्बल रंग फेकण्यास सुरूवात केली. या दरम्यान 22 हजारांपेक्षा अधिक अंडी आणि जवळपास 13 टन पीठ फेकण्यात आले.

या सणात सर्व नागरिकांनी सहभागी होणे गरजेचे असते. जो नागरिक यात भाग घेणार नाही अथवा नियम मोडेल, त्याला प्रशासनाकडून दंड ठोठवला जातो. दंडाची रक्कम चॅरिटीमध्ये दिली जाते. या सणात जापान, दक्षिण आफ्रिका, ब्रिटनसह 12 देशांचे पर्यटक सहभागी झाले होते.