या सरोवरात राहते आजार बरे करणारी जलपरी


जगभरात अनेक सुंदर सरोवरे आहेत. भारतात बहुतेक देवस्थानांजवळ नदी अथवा सरोवर असते आणि या बहुतेक ठिकाणी हे तलाव किंवा सरोवरांचे पाणी पवित्र आणि व्याधी बऱ्या करणारे मानले जाते. या समजुतीला परदेशही अपवाद नाहीत. परदेशात अनेक ठिकाणी असे दिव्य म्हणजे आजार बरे करणारे पाणी असलेली सरोवरे, झरे आहेत. पेरूच्या हुआकाचायना मध्ये असेच एक सरोवर प्रसिद्ध असून या सरोवरात राहणारी जलपरी येथे येणाऱ्यांचे आजार बरे करते असे मानले जाते.

ओअॅसीस ऑफ अमेरिका या नावाने हे ठिकाण पर्यटकात लोकप्रिय आहे. आकडेवारी सांगते येथे साधारण १०० लोक राहतात पण येथे दरवर्षी १० हजाराहून अधिक पर्यटक येतात. या सुंदर सरोवराच्या आजूबाजूला वाळूच्या टेकड्या आहेत. सरोवराचे पाणी आणि तेथील माती मध्ये अद्भूत गुण आहेत. या पाण्यात स्नान करून त्यानंतर माती अंगावर लावली जाते. त्यामुळे सर्व आजार दूर होतात असा अनुभव पर्यटक सांगतात.

हे सरोवर कसे बनले त्याची आख्यायिका अशी सांगतात, एक राजकुमारी येथे स्नान करण्यासाठी कपडे उतरवीत होती तेव्हा तिच्याजवळ असलेल्या आरशात तिला एक शिकारी तिच्या जवळ येत असल्याचे दिसले तेव्हा ती पळत सुटली पण हातातील आरसा तेथे पडला आणि त्याचेच सरोवर तयार झाले. ती पळत असताना तिच्या पावलामुळे जी वाळू उडाली त्याच्या टेकड्या बनल्या. तेव्हापासून राजकुमारी जलपरी बनून याच सरोवरात राहते. ही जलपरी काही पर्यटकांना दर्शनही देते आणि ज्यांना तिचे दर्शन घडेल त्याचे नशीब फळफळते असाही समज आहे.

Leave a Comment