जगभरात वापरात आहेत ९६ कॅलेंडर्स, येथे सर्वप्रथम नववर्ष येणार


नवीन वर्ष जगभरात १ जानेवारीला सुरु होते असे मानणारा वर्ग मोठा आहे. कालगणना करण्यासाठी कॅलेंडर किंवा पंचांग बनविली गेली आहेत. १ जानेवारीपासून नवीन वर्ष सुरु होते अशी मानणारी कालगणना ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणून प्रसिद्ध आहे. याचा उदय इंग्रज संस्कृतीतून झाला आणि जेथे जेथे ब्रिटीशांनी राज्य केले त्या बहुतेक ठिकाणी हेच कॅलेंडर वापरले जाते. मात्र जगात अनेक देशांची त्यांची स्वतःची कॅलेंडर्स आहेत. ही कालगणना करण्याची पद्धत त्या त्या देशाची संस्कृती दर्शवित असते. काही ठिकाणी कालगणना चांद्र पद्धतीने तर काही ठिकाणी सौर पद्धतीने केली जाते.

भारताचा विचार केला तर आपल्याकडे अशी ३६ पंचांगे किंवा कॅलेंडर होती त्यातील १२ आजही वापरात आहेत. जगात जेवढी विविध कॅलेंडर वापरात आहेत त्यानुसार बहुतेक ठिकाणी नवीन वर्ष फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान कधीतरी सुरु होते. भारतात विक्रम संवत आणि शक् संवत अशी कालगणना प्रामुख्याने मानली जाते. ग्रेगोरियन कॅलेंडर पोप ग्रेगरी याने पुन्हा दुरुस्त करून सादर केले आणि ते १३ मे १५८२ पासून लागू झाले असे मानतात.

यंदाच्या वर्षी नववर्षाचे पहिले पाउल कुठे पडणार याची अनेकांना उत्सुकता आहे. यंदाचे नववर्षाचे पहिले पाउल प्रशांत महासागरातील किरीबाटी द्वीपावर सामोआ राज्यात सुरु होणार आहे. ३१ डिसेंबर रोजी रात्रीचे १२ प्रथम या ठिकाणी वाजतील तेव्हा भारतीय घड्याळात दुपारी ३.३० मिनिटे झालेली असतील. त्यापाठोपाठ न्यूझीलंड येथे भारतीय वेळेनुसार ३.४५ मिनिटांनी नववर्ष सुरु होईल. या यादीत चीन, जपान, सिंगापूर सहित १४ देश आहेत आणि नवीन वर्ष सुरु होण्यात भारताचा नंबर १५ वा असेल.. त्यानंतर अर्ध्या तासाने पाकिस्तानात नववर्षाचे पाउल पडेल. नवीन वर्ष सर्वात शेवटी प्रशांत महासागरच्या भू मध्य रेषेवर उत्तरेकडे असलेल्या हाऊलंड बेटावर व हवाई आणि ऑस्ट्रेलियामधील बेकेट आयलंडवर सुरु होईल. त्यावेळी भारतात तारीख असेल १ जानेवारी आणि वेळ असेल ५.३० मिनिटे.

Leave a Comment