हे ब्रँड्स पूर्वी याकरिता होते प्रसिद्ध


अनेक वेळा, कित्येक स्टार्ट अप्स, ते विकत असलेली उत्पादने किंवा उत्पादने विकण्याची पद्धत बदलताना बघून, लहान व्यवसायांमध्ये अश्या अडचणी येत असल्याची आपली समजूत होते. पण आजच्या काळामध्ये जगातील अतिशय नामांकित असलेल्या मोठमोठ्या कंपन्यांना देखील अश्या अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. एका उत्पादनाची विक्री बंद करून, निराळेच उत्पादन बनविण्यास किंवा विकण्यास त्या कंपनीने सुरुवात केल्यानंतर तेच उत्पादन आता त्या कंपन्यांची ओळख ठरले आहे, आणि त्या कंपन्यांनी प्रसिद्धीचे शिखर गाठले आहे. पण एके काळी याच मोठमोठ्या कंपन्या अगदी लहान व्यवसायांच्या रूपामध्ये अस्तित्वात होत्या आणि ते विकत असलेली उत्पादने ही आजच्यापेक्षा फारच वेगळी होती.

विद्युत उपकरणे आणि मोबाईल फोन्स च्या क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवर ख्याती मिळविलेली सॅमसंग ही कंपनी आहे. पण १९३८ मध्ये ली बाय्अंग यांनी ‘सॅमसन सांगहो’ या नावाने हा लहान व्यवसाय सुरु केला, तेव्हा ते त्याद्वारे नूडल्स, वाळविलेले मासे, व किराणा माल विकत असत. १९४७ साली सेओल येथे स्थानांतरीत झाल्यानंतर व्यवसाय वाढीला लागला. पण कोरियाचे युद्ध सुरु झाल्याने ली बाय्अंग यांना सेओलमधून बाहेर पडावे लागले. त्यानंतर त्यांनी ब्युसान येथे साखर कारखाना सुरु केला. त्यानंतर हळू हळू इतरही अनेक व्यवसायांमध्ये पाऊल ठेवीत अखेरीस १९६० साली विद्युत उपकरणांच्या निर्मिती आणि विक्री क्षेत्रामध्ये ली बाय्अंग यांनी प्रवेश केला. आता सॅमसंग, विद्युत उपकरणे आणि मोबाईल फोन्सच्या क्षेत्रातील जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी म्हणून नावारूपाला आले आहे.

जगातील सर्वात मोठी, व्हीडोओ गेम्स बनविणारी ‘निन्तेन्डो‘ हे कंपनी सुरुवातीला ‘ हानाफुडा ‘ या नावाने पत्ते बनवीत असे. १९५३ साली निन्तेन्डो ने सर्वप्रथम प्लॅस्टिक पासून पत्ते बनविले. १९६०-७० या दशकामध्ये निन्तेन्डो ने व्हिडियो गेम्स च्या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर हाच व्यवसाय यशस्वी झाला.

‘लँबोर्घिनी‘ ही जगातील सर्वात महागड्या गाड्या बनविणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. पण ही कंपनी मुळात ट्रॅक्टर बनवीत असे. पण मग ट्रॅक्टर बनविताना महागड्या कार्स ची निर्मिती कशी काय सुरु झाली यामागे मोठी रोचक कथा आहे. फेरुचीयो लँबोर्घिनी यांनी आपल्या व्यवसायातून पुष्कळ पैसा कमविला. त्यांच्याकडे तेव्हा फेरारी ही कार होती. त्या कार मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने त्यांनी गाडी एन्झो फेरारी यांच्याकडे नेली. फेरुचियो हे कोट्याधीश असले, तरी त्यांची रहाणी अगदी साधी होती. एन्झो फेरारी यांनी लँबोर्घिनी यांना एक साधा शेतकरी समजून त्यांचा अपमान केला. त्याने चिडून जाऊन, फेरारीची खोड मोडण्यासाठी, फेरुचियो यांनी स्वतःच एका आलिशान गाडीची निर्मिती केली. ह्या गाडीच्या निर्मिती नंतर ‘ लँबोर्घिनी ‘ या नावाने लक्झरी कार्स तयार होऊ लागल्या.

च्युईंग गम बनविणारी जगातील सर्वात मोठी कंपनी रीग्ली असून, पूर्वी ही कंपनी साबण आणि बेकिंग सोडा बनवीत असे. विलियम रीग्ली यांनी हा साबण व सोडा विक्रीचा व्यवसाय सुरु केला. तेव्हा साबण आणि सोड्याच्या खरेदीसोबत ग्राहकांना एक च्युईंग गम ची वडी मोफत दिली जात असे. त्यानंतर साबण किंवा सोड्यापेक्षा रीग्ली यांनी बनविलेले च्युईंग गमच लोकांना जास्त पसंत पडू लागल्याचे रीग्ली यांच्या लक्षात आले, आणि मग च्युईंग गम बनविण्याच्या व्यवसायाला सुरुवात झाली.

Leave a Comment