ट्रिपल तलाक पीडितांना मिळणार सहा हजार रूपये वार्षिक पेन्शन


लखनऊ – ट्रिपल तलाकला बळी पडलेल्या महिलांना वार्षिक सहा हजार रूपये पेन्शन उत्तर प्रदेश सरकारने घेतलेत्या नव्या निर्णयानुसार देण्यात येणार असून याबाबतची माहिती शनिवारी सरकारी सूत्रांनी दिली.

उत्तर प्रदेश सरकारने चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये, ट्रिपल तलाक प्रथेला बळी पडलेल्या महिलांना मदत देण्याचे ठरवले आहे. यानुसार, महिन्याला ५०० रूपये पेन्शन एका महिलेला देण्यात येईल. शिया समाजाचे नेते मौलाना सैफ अब्बास यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले, की सरकारने ट्रिपल तलाक पीडितांना आर्थिक मदत देण्याऐवजी, त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि राहण्यासाठी जागा यावर लक्ष द्यावे.

तर, सुन्नी समाजाचे नेते मौलाना सुफैना म्हणाले, की सरकार हे या मुद्द्यावरून केवळ राजकारण करत आहे. अवघे ५०० रूपये मदत देऊन सरकार काय मदत करू इच्छित आहे, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल. सामाजिक कार्यकर्ते शाहिस्ता अंबर म्हणाले, की सरकारचा ट्रिपल तलाकच्या पीडितांना मदत करण्याचा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे. पण, मदत म्हणून मिळणारी रक्कम ही खूपच कमी आहे. वर्षभरासाठीच्या मूलभूत गरजाही सहा हजार रूपयांमध्ये भागवणे अशक्य आहे.

Leave a Comment