असे ही मायक्रोवेव्ह ओव्हनचे फायदे


आपल्या घरी असलेला मायक्रोवेव्ह ओव्हन आपण केवळ काही ठराविक खाद्यपदार्थ बनविण्यासाठी किंवा अन्नपदार्थ गरम करण्यासाठी वापरतो. पण या व्यतिरिक्त अजून कितीतरी कामांसाठी आपला मायक्रोवेव्ह आपल्याला वापरता येऊ शकतो. एखाद्या पाकिटावरील स्टॅम्प काढावयाचा असेल, किंवा एखादे सील केलेले पाकीट न फाडता उघडायचे असेल, तर तो स्टॅम्प किंवा चिकटविलेले पाकिट, एक थेंब भर पाण्याने हलके ओलसर करून घेऊन वीस सेकंद मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून घ्यावे. पाकिटावरील स्टॅम्प अगदी सहज निघून येईल किंवा चिकटविलेले पाकिट सहज उघडता येईल.

दाणे किंवा काजू, बदाम भाजावयाचे असतील, तर एका मायक्रोवेव्ह सेफ प्लेटमध्ये थोडेसे तेल घालून घेऊन त्यावर दाणे किंवा काजू – बदाम पसरून ठेवावेत. त्यानंतर हे दाणे किंवा भाजावयाचा असेलेला इतर सुका मेवा एक मिनिटाकरिता मायक्रोवेव्ह मधून गरम करून घ्यावा. आपल्याला हवे तितके दाणे किंवा सुकामेवा खरपूस भाजला जाईपर्यंत एक एक मिनिटाकरिता मायक्रोवेव्ह चालवत राहावे. साधारण चार ते पाच मिनिटांमध्ये दाणे किंवा सुका मेवा अगदी खरपूस भाजून तयार होईल.

कधी तरी घरी आणलेल्या बटाटा वेफर्सची पिशवी कोणीतरी खाताना तशीच उघडी ठेऊन देते, आणि मग त्यातील वेफर्स अगदी मऊ पडून जातात. अश्या वेळी वेफर्स एका टिश्यू पेपरवर ठेऊन मायक्रोवेव्ह मधून गरम करून घेतल्यास ते पुन्हा कुरकुरीत होतात. बटाटे, रताळी किंवा प्युरी करण्याकरिता टोमॅटो मायक्रोवेव्हमध्ये वाफविले जाऊ शकतात. पण या सर्वच भाज्यांची साले जाडसर असल्याने त्या भाज्या मायक्रोवेव्ह मध्ये वाफेने फुगून फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे बटाटे, रताळी, टोमॅटो यांसारख्या भाज्या मायक्रोवेव्ह मध्ये भाजयच्या असतील, तर त्यांच्या साली सर्व बाजूने काट्याच्या मदतीने टोचून घेऊन मगच मायक्रोवेव्ह मध्ये भाजण्यासाठी ठेवाव्यात.

कांदे चिरत असताना नेहमी डोळ्यांतून पाणी येते. विशेषतः एखाद्या पदार्थाकरिता जर जास्त कांदे चिरायची वेळ आली, तर अगदी हैराण व्हायला होते. अश्या वेळी कांदे काट्याने टोचून घेऊन तीस सेकंद मायक्रोवेव्ह मध्ये गरम करावेत आणि मग चिरावेत. त्याने डोळ्यांतून पाणी येणार नाही. तसेच कोथिंबीर किंवा कढीपत्ता, पुदिन्यासारखे पदार्थ सुकवून ठेवावयाचे असल्यास एका पेपर प्लेट मध्ये ठेऊन तीन ते चार मिनिटे मायक्रोवेव्ह मध्ये फिरवून घ्यावेत. तसेच कसुरी मेथी मऊ पडली असल्यास ती ही एका मिनिटाकरिता मायक्रोवेव्ह मधून फिरवून घेतल्यास पुन्हा कुरकुरीत होईल. लसूण सोलावायाचा अगदी सोपा उपाय म्हणजे, लसणीचा गड्डा मायक्रोवेव्ह मध्ये ठेऊन पंधरा ते वीस सेकंद मायक्रोवेव्ह मध्ये फिरवावा. लसणीची साले अगदी आरामात सुटून येतील. लिंबामधून किंवा संत्र्यातून जास्तीतजास्त रस काढून घेता यावा यासाठी लिंबे किंवा संत्री दहा सेकंद मायक्रोवेव्ह मध्ये ठेऊन गरम करावीत. त्यामुळे त्यांचा रस अगदी सहज काढता येतो.

Leave a Comment