महाराष्ट्र-कर्नाटक दोन्ही राज्यातील एसटी वाहतूक बंद


मुंबई – कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवर उभे करुन गोळ्या घाला, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. महाराष्ट्रातून त्यांच्या या वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच कन्नड वेदिका संघटनेनेही कर्नाटकात आक्रमक पवित्रा घेतला आहे. परिणामी, वातावरण बिघडू लागल्याने दक्षतेचा उपाय म्हणून दोन्ही राज्यातील परिवहन महामंडळाने एसटी सेवा बंद केली आहे.

दोन्ही राज्याच्या सीमाभागात तणाव निर्माण झाला आहे. बससेवा पुढील आदेश मिळेपर्यंत बंद राहील, अशी माहिती मिळाली आहे. कोल्हापूर, कागल, निपाणी,बेळगाव अशा बस स्थानकांमध्ये उभय राज्यातील प्रवाशी अडकले आहेत. दुसरीकडे, दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले जात आहे. त्यातच आज बेळगाव येथे चंदगडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार राजेश पाटील यांचा महाराष्ट्र एकीकरण युवा समिती मार्फत आणि समस्त बेळगावकर सीमावासियांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम अनगोळ येथे आदर्श मल्टिपर्पज सोसायटी सभागृहात होणार आहे. पण कन्नड वेदिका संघटनेने महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेला कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.

शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी भीमाशंकर पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याला उत्तर देताना कधी आणि कुठे गोळ्या घालणार आहात याची तारीख आणि वेळ सांगा, पाहूया तुमच्या गोळ्या कमी पडतात की आमची माणसे, याचे उदाहरण घालून देऊ, असा इशारा दिला होता. याच वादाचे हे पडसाद असलेले दिसत आहे. शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी त्याला तसेच करड्या भाषेत प्रत्युत्तर दिले. पण हा वाद आता चांगलाच चिघळल्याचे दिसत आहे.

कर्नाटक राज्यात जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व बस सीमाप्रश्नाची धग तापल्याचे पाहून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी मध्यरात्रीपासून सर्व बस रद्द करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी हा निर्णय तणाव आणि नुकसान टाळण्यासाठी घेतला आहे. बससेवा पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देशही पोलिसांनी परिवहन महामंडळाला दिले असल्यामुळे उभय राज्यात प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची कोंडी झाली आहे. खाजगी, शेअर वाहतुकीचा मार्ग प्रवाशी शोधत आहेत.

Leave a Comment