शरीरावर मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या सतत वापराने होऊ शकतात का दुष्परिणाम ?


आपण संपूर्ण दिवसभरात अनेक प्रकारची गॅजेट्स वापरत असतो. या गॅजेट्स च्या मार्फत जगभरातील घडामोडी अगदी घरबसल्या आपल्याला समजत असतात. पण या गॅजेट्सच्या सतत वापराचा परिणाम आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारे होऊ शकतो. गॅजेट्सच्या आहारी गेल्याने निद्रनाशासारखे त्रास जाणवू लागल्याचे आपण अनेकदा ऐकत असतो, पण या गॅजेट्स मुळे आपल्या शरीरावरही अनेक प्रकारचे दुष्परिणाम होत असतात, याचा विचार करणेही अगत्याचे आहे.

काही व्यक्तींना मोबाईल किंवा कॉम्प्यूटरच्या स्क्रीनकडे पाहताना सतत डोळे बारीक करून पाहण्याची सवय असते. त्यामुळे डोळ्यांच्या अवतीभोवती सुरकुत्या पडू लागतात, तसेच डोळ्यांवरही सतत ताण जाणवू लागतो. त्यामुळे स्क्रीनकडे बघताना डोळे बारीक करून बघणे टाळावे. कॉम्प्युटर किंवा मोबाईल आपल्या शरीराच्या खूप जवळ ठेवणे हे टाळावे. या गॅजेट्स मधून बाहेर पडणारे रेडियोमॅग्नेटिक किरण आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. तसेच कॉम्प्युटर किंवा मोबाईल स्क्रीन मधील अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे त्वचा आणि डोळे या दोहोंना अपाय होऊ शकतो.

कॉम्प्युटर वर काम करताना आपण वापरतो ती खुर्ची आरामदायक असेल असे पहावे. काही व्यक्तींना दिवसभर कॉम्प्युटरवर काम करावे लागते, त्यांनी या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी. खुर्ची बसण्यास आरामदायक नसेल, तर त्याचा ताण पाठीच्या मणक्यांवर जाणवायला लागून, पाठदुखीचा त्रास सुरु होऊ शकतो. तसेच सतत बसून काम केल्याने पायांकडे होणारे रक्ताभिसरण व्यवस्थित न होऊन, पायांवर सूज येऊ लागते. असे होऊ नये म्हणून थोड्या थोड्या वेळाने जरासे पाय मोकळे करण्यासाठी ऑफिस मधेच किंवा घरातल्या घरात पायी चालावे, किंवा लिफ्ट ऐवजी जिन्यांचा वापर करावा.

अनेक व्यक्तींना मोबाईल फोन खांद्याच्या व कानाच्या मध्ये धरून, एकीकडे काम करत बोलण्याची सवय असते. अश्या पद्धतीने जास्त वेळ बोलत राहिल्यास मानेचे दुखणे उद्भवू शकते. तसेच कॉम्प्युटरवर खाली मान झुकवून काम करीत असल्यासही मानदुखीचा त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे कॉम्प्युटरचा स्क्रीन नेहमी आपल्या डोळ्यांसमोर असेल अश्या पद्धतीने ठेवायला हवा.

रात्री झोपायच्या अर्धा तास आधीपासून कॉम्प्युटर किंवा मोबाईल चा वापर करणे थांबवावे. त्याऐवजी मन शांत करणारे आपल्या आवडीचे एखादे चांगले पुस्तक वाचावे, किंवा शांत संगीत ऐकावे. त्यामुळे शांत झोप लागण्यास मदत मिळते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment