बहुगुणकारी कडूलिंब


कडूलिंब आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेकारक सिद्ध झालेला असून, त्याच कारणाकरिता कडूलिंबाला ‘ घरगुती दवाखाना ‘ असे देखील म्हटले जाते. त्यामध्ये असणाऱ्या औषधी गुणांमुळे, आयुर्वेदिक उपचारपद्धतीमध्ये कडूलिंबाचा वापर फार प्राचीन काळापासून होत आहे. कडूलिंबाला आयुर्वेदामध्ये ‘श्रेष्ठ, परिपूर्ण आणि कधीही खराब न होणारे’ म्हणून फार महत्व दिले गेले आहे.

कडूलिंबामध्ये बॅक्टेरियांशी लढण्याची ताकद आहे. आपल्या शरीरामध्ये अनेक तऱ्हेचे जीवाणू असतात. यातील बहुतेक जीवाणूंपासून आपल्या शरीराला कोणताही अपाय होत नाही. पण काही जीवाणू आपल्या शरीरामध्ये निरनिराळे रोग उद्भविण्यास कारणीभूत ठरतात. कडूलिंबाच्या सेवनाने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढून, हानिकारक जीवाणूंचा नाश होतो.

मौखिक स्वास्थ्यासाठीही कडूलिंब अतिशय फायदेशीर आहे. कडूलिंबाच्या पानांचा रस काढून घेऊन तो रस आपल्या दातांवर आणि हिरड्यांवर चोळावा. काही मिनिटे हा रस दातांवर व हिरड्यांवर तसाच राहू देऊन, त्यानंतर कोमट पाण्याने चुळा भरून टाकाव्यात. दिवसातून एकदा या उपायाचा अवलंब केल्यास दात आणि हिरड्या निरोगी राहतात. कडूलिंबाच्या कोवळ्या देठाचा वापर दात साफ करण्यासाठी केला जातो. त्यामुळे दात सहजासहजी किडत नाहीत, व हिरड्याही मजबूत राहतात.

कडूलिंबाच्या पानांच्या सेवनाने रक्तशुद्धी होते. दर दिवशी दोन तीन कडूलिंबाची पाने मधाबरोबर रिकाम्या पोटी खाल्ल्याने रक्तशुद्धी होऊन, त्वचेवर येणारी मुरुमे, पुटकुळ्या नाहीशा होतात. गरम पाण्यामध्ये कडूलिंबाची काही पाने उकळून घेऊन ते पाणी प्यायल्यानेही रक्तशुद्धी होते. उन्हाळ्यामध्ये घामोळ्या होत असल्यास, किंवा अंगाला खाज सुटत असल्यास कडूलिंबाची पाने पाण्यामध्ये उकळून घेऊन, ते पाणी आंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळावे. या पाण्याने आंघोळ केली असता, घामोळी नाहीशी होतात, व अंगाची खाज कमी होते. पोटामध्ये जंत झाले असल्यासही कडूलिंबाच्या सेवनाने फायदा होतो.

कडूलिंबाच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते, शरीरावरील सूज कमी होते, शरीरातील मुक्त कण ( फ्री रॅडीकल्स ) व हॉर्मोन्सच्या कार्यावर नियंत्रण ठेवता येते. तसेच कडूलिंबामध्ये शरीरातील कोषिका विभाजन रोखण्याची क्षमता आहे. या सर्व गुणांमुळे कर्करोगासारख्या आजारांमध्ये कडूलिंबाचे सेवन उपयुक्त ठरत आहे.

कडूलिंब हे एक उत्तम हेअर टॉनिक आहे. ज्यांच्या केसांमध्ये वारंवार कोंडा होत असेल, अश्या व्यक्तींनी कडूलिंब पाण्यामध्ये उकळून घेऊन त्यामध्ये थोडेसे मध घालावे, व हे मिश्रण केसांना लावावे. अ अर्धा तास हे मिश्रण केसांना लावून ठेऊन, त्यानंतर केस स्वच्छ धुवावेत. या उपायाने केसांमधील कोंडा नाहीसा होऊन केस मुलायम बनतील.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment