एव्हरेस्ट सर करणारी सर्वात वयस्क भारतीय महिला – प्रेमलता अग्रवाल


एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचण्याच्या काही वेळ आधी प्रेमलताने घातलेल्या हातमोज्यांपैकी एक हातमोजा हरवला. तितक्या उंचीवर थंडीही भीषणच होती. त्या तसल्या हवामानामध्ये हातमोज्यांशिवाय पुढे जाणे अशक्य होते. प्रेमलता हातमोज्यांशिवाय पुढे गेली असती तर हिमबाधा होण्याचा धोका होता. त्यामुळे मागे फिरण्यावाचून कोणताही पर्याय प्रेमलतासमोर नव्हता. तशी ती मागे फिरली देखील, पण तेवढ्यात तिच्या सुदैवाने तिला बर्फात एक हातमोज्यांचा जोड सापडला. जणू काही तिच्यासाठीच ते हातमोजे तिथे कोणीतरी ठेऊन दिले होते !

“ आपल्या आयुष्यामध्ये नशीबाचा फार मोठा वाटा असतो. माझे हातमोजे हरविले, पण नशीबाने साथ दिली म्हणून हातमोजांच्या दुसरा जोड सापडला आणि मी पुढे जाऊ शकले, शिखर सर करू शकले “, असे प्रेमलता म्हणतात. प्रेमलता अग्रवाल आता ५४ वर्षांच्या गृहिणी असून, वयाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत त्यांनी जगामधील सात शिखरे सर केली. २०११ साली त्यांनी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले. त्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल २०१३ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन गौरविले. तसेच यावर्षीचे ‘ तेनझिंग नोर्गे नॅशनल अॅडव्हेन्चर अॅवॉर्ड ‘ ही प्रेमलता यांना देण्यात आले आहे.

प्रेमलता यांचा जन्म पश्चिम बंगाल मधील दार्जीलिंग जिल्ह्यातील सुखिया पोखरी या गावात झाला. त्यांचे वडील राम अवतार अग्रवाल व्यावसायिक असून, त्यांची आई गृहिणी होती. अग्रवालांचे जवळ जवळ तीस माणसांचे कुटुंब होते. या कुटुंबामध्ये लहान मुले ही भरपूर होती. लहानग्या प्रेमलताला शाळेत असल्यापासूनच खेळ, अॅडव्हेन्चर स्पोर्ट्स ची आवड होती. शालेय शिक्षण पूर्ण होताच प्रेमलताचा विवाह विमल अग्रवाल यांच्याशी झाला. ते व्यवसायाने पत्रकार होते. त्यानंतर प्रेमलता यांना दोन मुलीही झाल्या.

प्रेमलता आपल्या मुलींना टेनिस खेळण्यासाठी जेआरडी टाटा स्पोर्ट्स कॉम्पलेक्स मध्ये घेऊन जात असत. तिथे त्यांनी दाल्मा हिलचा ट्रेक आयोजित होत असल्याची सूचना वाचली. त्यांनी या ट्रेकला जाण्याचे ठरविले, आणि पाचशे च्या वर प्रतिस्पर्धी असणाऱ्या या ट्रेक मध्ये प्रेमलता यांनी तिसरे स्थान पटकाविले. आपले प्रशस्तीपत्रक घेण्यासाठी त्या गेल्या असताना तिथे सुप्रसिद्ध गिर्यारोहक बचेंद्री पाल यांची छायाचित्रे पाहून प्रेमलता प्रेरित झाल्या. आपल्या मुलींनाही अॅडव्हेन्चर स्पोर्ट्स मध्ये सहभागी करण्याचे ठरवून प्रेमलता जेव्हा मुलींची नावे नोंदविण्यासाठी गेल्या, तेव्हा त्यांची भेट प्रत्यक्ष बचेंद्री पाल यांच्याशी झाली. मुलींची नावे देण्यापेक्षा प्रेमलता यांनी आपले स्वतःचे नाव नोंदवावे आणि गिर्यारोहणाचे प्रशिक्षण घ्यावे या बचेंद्री पाल यांच्या आग्रहाला प्रेमलता यांनी त्वरित संमती दिली. त्यावेळी त्यांचे वय पस्तीस वर्षांचे होते.

२००८ साली प्रेमलता यांनी सर्वप्रथम बचेंद्री पाल यांच्या मार्गदर्शनाखाली साऊथ आफ्रिकेतील किलीमांजारो शिखर सर केले. वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी एव्हरेस्टचे शिखर सर करण्याचा निर्णय प्रेमलता यांनी घेतला. एव्हरेस्टवर चढाई करीत असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. भाषेची अडचण होतीच, पण त्या शिवाय त्यांच्या टाचेच्या जुन्या दुखण्यानेही त्या हैराण होत्या. त्यातून चढाई दरम्यान हवामानही क्षणाक्षणाला बदलत होते, त्याचा ही चांगलाच त्रास जाणवत होता. पण प्रेमलताने जिद्द सोडली नाही. त्यावेळी त्यांच्या डोळ्यांसमोर, भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकवायचा, एवढे एकच लक्ष्य होते.

२६,००० फुटांच्या उंचीवर हवामानाने रौद्र रूप धारण केले, आणि परत फिरावे लागेल की काय या चिंतेने प्रेमलता आणि त्यांच्या टीमला ग्रासले. पण त्यांच्या सुदैवाने हवामान लवकरच पालटले, आणि पुनश्च चढाईला सुरुवात झाली. अखेरीस, २० मे २०११ रोजी प्रेमलताने एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. आपल्या या यशाचे श्रेय प्रेमलता, बचेंद्री पाल यांना देतात. एक गृहिणी असूनही त्यांनी जे यश मिळविले, त्यातून सर्व गृहिणींनी प्रेरणा घ्यावी असे त्यांना वाटते. प्रत्येक गृहिणीच्या मनात स्वतःबद्दलच्या काही अपेक्षा असतात. या अपेक्षा जिद्दीने पूर्ण करायला हव्यात असे प्रेमलता म्हणतात.

Leave a Comment