संगणक, लॅपटॉप हाताळताना…


वेळोवेळी संगणक किंवा लॅपटॉपची यंत्रणा अपडेट केल्यास काम करताना अडचणी येत नाहीत. अन्यथा दुरुस्तीला देण्याशिवाय पर्याय राहत नाही. संगणक किंवा लॅपटॉप हाताळताना काय टाळावे हे जाणून घ्या

अडचणीची जागा – संगणक किंवा लॅपटॉप ठेवण्याची जागा कोणती आहे, यावर संगणकाची कार्यक्षमता अवलंबून असते. कोंदट ठिकाणी, अरुंद ठिकाणी संगणक ठेवणे टाळावे. आपण घरातील जागा वाचवण्यासाठी संगणक भिंतीला, पडद्याला किंवा सोफ्याला चिटकून ठेवतो. त्यामुळे जागा तर वाचते, मात्र संगणकातील यंत्रणेला बाहेरची हवा लागणे बंद होते. संगणक किंवा लॅपटॉपच्या भोवती नेहमी खेळती हवा असावी. जेणेकरून संगणक गरम होणार नाही. संगणकातील तापमान वाढत गेले तर आतील यंत्रणेत दोष निर्माण होऊ शकतो.

ओव्हरचार्जिंग, उष्ण तापमान – जर संगणक सूर्यप्रकाशात पडणाऱ्या जागेत, इस्त्री किंवा हिटरजवळ ठेवले तर अनेक पार्ट खराब होण्याचा धोका असतो. त्यामुळे शक्‍यतो इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे संगणकापासून दूर ठेवावीत. याशिवाय अधिक उष्णतेमुळे प्लास्टिक वितळण्याची शक्‍यता असते. एसी यंत्रणा असेल तर संगणकाचे आयुष्य आणखीच वाढते, हे सांगायची गरज नाही. याशिवाय अधिककाळ लॅपटॉप चार्जिंग केल्यामुळेही यंत्रणेवर परिणाम होऊ शकतो.

फाईल डिलिट न करणे – संगणक किंवा लॅपटॉपचा वापर काही मंडळी एखाद्या गोदामाप्रमाणे करतात. विविध कार्यक्रमांचे फोटो, डाऊनलोड केलेले चित्रपट, गाणी, डिजिटल पावत्या आदींने संगणक भरलेले असते. कालांतराने हार्डडिस्क जसजशी फुल होते तसतसा संगणकाचा वेग कमी होत जातो. अशा वेळी नवीन अथवा एक्‍स्टर्नल हार्डडिस्क खरेदी करून महत्त्वाच्या फाईल त्यात शिफ्ट केल्यास संगणकावरचा ताण बराच कमी होऊ शकतो. कामाची संबंधित असलेली फाईल ठराविक काळाकरिताच संगणकात ठेवावी. काम आटोपल्यावर ती डिलिट केलेली बरी. महत्त्वाच्या डिजिटल पावत्या आपल्याला केव्हाही उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे त्या सेव्ह करून ठेवण्यात काहीच अर्थ राहत नाही. अनेक कालबाह्य चित्रपट देखील आपल्या संगणकातील बरीच जागा अडवून ठेवतात. आणखी एक बाब लक्षात ठेवावी की, एसवायएस, डीएलएल किंवा इएक्‍सई यासारख्या फाईल डिलिट करू नयेत. या फाईल प्रोग्रॅम, सिस्टिम 32, विंडोजशी निगडीत असतात.

लिक्‍विडने स्क्रिन पुसणे – संगणक किंवा लॅपटॉपचा स्क्रिन स्वच्छ करण्यासाठी अनेक जण लिक्विडचा वापर करतात. परंतु ही बाब संगणकाला हानीकारक आहे. त्यामुळे स्क्रिन खराब होऊ शकते. या लिक्विडमध्ये असलेल्या पदार्थामुळे स्क्रिनवर डाग पडू शकतात आणि आतील यंत्रणेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्क्रिन चांगला राहण्यासाठी मायक्रोफायबर क्‍लॉथचा वापर करावा.

सीडी किंवा डिव्हीडी जोरात इन्सर्ट करणे – सिडी ड्राईव्हमध्ये सीडी किंवा डिव्हीडी इन्सर्ट केल्यानंतर आतमध्य जोरात ढकलण्याचा प्रयत्न काही जण करतात. त्यामुळे सिडी ड्राईव्ह खराब होऊ शकतो. सिडी ड्राईव्ह हे सिस्टिमप्रमाणे काम करत असते. सिडी ड्राईवंहच्या क्‍लिपमध्ये योग्य तऱ्हेने इन्सर्ट झाली की नाही, हे पाहावे. अन्यथा अधांतरी असेल तर ड्राईव्ह आतमध्ये जाणार नाही. तसेच ड्राईव्ह आणि टेबल यात पुरेसे अंतर असावे. जर लॅपटॉप गादीवर ठेवला तर सिडी ड्राईव्ह उघडला जाणार नाही. त्यामुळे कठिण पृष्ठभागावरच लॅपटॉप किंवा संगणक असावा.

Leave a Comment