उद्योग, व्यवसाय वाढीसाठी…


प्रत्येक उद्योजक आपल्या व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्नशील असतो; परंतु उद्योगधंद्यात यश मिळविण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा असतो तो ग्राहक. ग्राहकांना त्यांच्या मतानुसार सेवा, उत्पादन दिले, तर त्याचा फायदा व्यवसाय वाढीसाठीच होतो.

* नेहमी उपलब्ध राहा – तुम्हाला जर तुमच्या ग्राहकाला आनंदी ठेवायचे असेल, तर त्या ग्राहकाशी संबंधित किंवा कंपनीशी संबंधित व्यक्तींच्या नेहमी संपर्कात राहा. या ग्राहकांच्या फोन कॉल्सना, ई-मेल्सना, प्रत्यक्ष भेटायला आलेल्या व्यक्तींना लवकरात लवकर प्रतिसाद द्यावा. यामुळे त्यांचा तुमच्यावरचा विश्‍वास दृढ होत जातो. यासाठी कंपनीचे प्रमुख म्हणून उपलब्ध असणे गरजेचे असते. या कृतीमुळे चांगला ग्राहक तुमच्यापासून दूर जाणार नाही.

* उत्पादन/सेवेची पूर्ण माहिती ठेवा – ग्राहकाला आपल्या कंपनीशी जोडून ठेवण्यासाठी व्यावहारिक नाते जपणे आवश्‍यक असते. तसेच, त्याला देण्यात येणाऱ्या सेवेविषयी किंवा उत्पादनाविषयी अद्ययावत माहिती ठेवणे आवश्‍यक असते. ग्राहकाने आपल्याला उत्पादन किंवा सेवेविषयी माहिती विचारली असता जास्त वेळ न दवडता ती तुम्हाला देता आली पाहिजे. तसे न झाल्यास ग्राहक नाखूश होऊन परत जाण्याची शक्‍यता असते. म्हणूनच ग्राहकाला दर्जेदार सेवा देण्यासाठी स्वतःच्या कंपनीची, सेवेची, उत्पादनाची सखोल माहिती ठेवा.

* ग्राहकाच्या गरजा जाणून घ्या – नवीन सेवा देताना ग्राहकाच्या गरजा माहीत करून घ्या. ग्राहकाला गरजा सांगताना त्याबद्दल काही शंका असेल तर त्याचे निरसन करा. ऐकण्यातील एकही छोटी चूक तुमचे नुकसान करू शकते. याउलट त्याची नेमकी गरज ओळखून सेवा, उत्पादन विकले, तर ग्राहक खूश होतो.

* कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या – दर्जेदार ग्राहकसेवा देण्यासाठी केवळ तुम्ही एकट्याने प्रयत्न करून चालणार नाही. तुमच्या संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या सर्वांना तसे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कर्मचारी प्रशिक्षित असतील तर निम्म्या समस्या तिथेच सुटू शकतात. त्याचबरोबर तुमच्या संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्याचा ग्राहकाशी उत्तमच व्यवहार असला पाहिजे.

* फिडबॅक आवश्‍यक – तुमची कंपनी ज्या- ज्या ग्राहकांना सेवा उत्पादन देते, त्या सर्व ग्राहकांकडून ते यावर आनंदित आहेत का, ते आपल्याविषयी काय विचार करतात, हे जाणून घेणे आवश्‍यक असते. हे जोवर तुम्ही माहिती करून घेत नाही तोवर तुम्हाला आपल्या सेवेत किंवा उत्पादनात काय बदल करायचे, हे लक्षात येणार नाही. ही गोष्ट तुमच्या व्यवसायात अपयशाचे कारण ठरू नये, यासाठी फिडबॅक जरूर घ्या.

Leave a Comment