बॉक्सिंग डे कसोटीसह ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय


मेलबर्न – ऑस्ट्रेलियाने बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंडचा २४७ धावांनी दारूण पराभव केला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह तीन सामन्याच्या कसोटी मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. २४० धावांत न्यूझीलंडचा दुसरा डाव आटोपला. न्यूझीलंडकडून सलामी फलंदाज टॉम ब्लंडेलने सर्वाधिक १२१ धावा केल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून फिरकी गोलंदाज नॅथन लायनने चार बळी घेतले. सामनावीरच्या पुरस्काराने युवा ट्रेव्हिस हेडला गौरवण्यात आले. पहिल्या डावांत हेडने ११४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. कसोटी कारकीर्दीतील तसेच वर्षांतील दुसरे शतक ट्रेव्हिस हेडने झळकावले. त्याने यापूर्वी फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद १६१ धावांची खेळी साकारली होती.

दरम्यान सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पॅट कमिन्सने (५/२८) केलेल्या भेदक गोलंदाजीला जेम्स पॅटिन्सन (३/३४) आणि मिचेल स्टार्क (२/३०) यांची उत्तम साथ लाभल्यामुळे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा पहिला डाव फक्त १४८ धावांत गुंडाळला होता. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३१९ धावांची आघाडी मिळूनही फॉलोऑन लादला नाही. दुसरा डाव ऑस्ट्रेलियाने पाच बाद १६८ धावांवर घोषित केला. त्यापूर्वी, न्यूझीलंडचा डाव शुक्रवारच्या २ बाद ४४ धावांवरून पुढे खेळताना कमिन्स, स्टार्क आणि पॅटिन्सनच्या त्रिकुटापुढे कोलमडला. पहिल्या डावांत टॉम लॅथम (५०) वगळता न्यूझीलंडचा एकही फलंदाज २०हून अधिक धावा करू शकला नाही.

Leave a Comment