परवडणारे दागिने


प्रत्येक वेळी महागडे दागिने घेण्याची गरज असतेच असे नाही. महागड्या दागिन्यांवर पैसे न घालवता कमी पैशांतही उत्तम दागिने मिळू शकतात.
दागिने विविध आकार, लांबी, रुंदी तसेच पोताचे मिळू शकतात. आपल्या व्यक्तिमत्त्वाला आणि कपड्यांना साजेसे दागिने निवडावेत. काही निवडक दागिने जे दिसायला मोठे असतात; पण खिशाला परवडणारे असतात.

पासले नेकलेस – या नेकलेसला विविध रंगांतील; पण उच्च दर्जाचे खडे लावलेले असतात. ऱ्होडियम आणि सोन्याचे प्लेटिंग असलेल्या या नेकलेसबरोबर अंगठी आणि कानातलेही असतात. त्यामुळे पारंपरिक पेहरावावरही ते उठून दिसतात. विविध रंगांतील खडे लावलेले असल्याने हा दागिना सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो.

मोराच्या आकारातील कुंदन ज्वेलरी– ऱ्होडियम आणि सोनेरी अशा दुहेरी रंगांतील कुंदन वर्क केलेला नेकलेस ही देखील उत्तम निवड आहे. क्‍युबिक झिर्कोनिआ खडा लावून हा नेकलेस सजवलेला असतो. अगदी बारीक मोर कोरलेला हा पारंपरिक प्रकारातील नेकलेस शोभून दिसतो. हिरव्या आणि लाल रंगातील पाण्याच्या थेंबाच्या आकारातील बीडस्‌ लावल्याने या नेकलेसचे सौदर्य अधिकच खुलून दिसते.

साऊथ इंडियन कॉइन नेकलेस – दक्षिण भारतात कॉइन नेकलेस किंवा महाराष्ट्रात त्याला लक्ष्मीहार असे म्हटले जाते. सोन्याची नाणी आणि त्याला मोती, रंगीत खडे यांची सजावट केलेली असते. या हाराला सोन्याचे पॉलिशच उत्तम दिसते, त्यामुळे ते अगदी खरेही वाटते. सुंदर अशा जरीचे काठ असणाऱ्या पारंपरिक सिल्क साडीवर हा हार घातल्यास नक्कीच उठावदार दिसतो.

पेंडंट चेन स्टाइल नेकलेस – चेन आणि त्याला पेंडंट असणारे हे नेकलेस हलके असले तरीही कोणत्याही कार्यक्रमासाठी शोधून दिसतात. चेनमधील पेंडंटला ऑस्ट्रेलियन आणि कुंदनचे खडे लावता येऊ शकतात. लांब अनारकली ड्रेसवर चेन आणि पेंडंट नक्कीच शोभून दिसेल.

कुंदन- ऑस्ट्रियन हिऱ्यांचा नेकलेस – या नेकलेसमध्ये पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम पाहायला मिळतो. ऑस्ट्रियन हिरे आणि कुंदर खडे यांचा वापर करून तो घडवलेला असतो. लाल आणि हिरवा अशा मिश्र रंगांतील शिफॉनच्या किंवा जॉर्जेटच्या साडीवर हा नेकलेस उत्तम शोभून दिसतो.

गोल्ड प्लेटेड, पॉलिश्‍ड ज्वेलरी – काहीतरी वेगळी, हटके अशी ज्वेलरी निवडायची असेल, तर गोल्ड प्लेटेड नेकलेसचा पर्याय निवडावा. अत्यंत सुबक असे सोनेरी मुलामा केलेले हे दागिने अगदी खऱ्या सोन्यासारखेच दिसतात.

व्हाइट गोल्ड प्लेटिंग आणि ऑस्ट्रियन स्टोन्स – लग्न सोहळ्यात वेगळा स्वागत समारंभ असतो किंवा एखादी पार्टी असते किंवा लग्नासंदर्भातील इतरही काही कार्यक्रम असतात. बहुतेकदा हे कार्यक्रम संध्याकाळी असतात. अशा कार्यक्रमांना व्हाइट गोल्ड प्लेटेड दागिने जे ऑस्ट्रियन खड्यांचा वापर करून सजवलेले असतात, ते घातले तर ते अतिशय उत्तम दिसतात.

Leave a Comment