देशातील दुसरी खासगी रेल्वे मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणार


नवी दिल्ली – मुंबई-अहमदाबाद दरम्यान देशातील दुसरी खासगी ‘तेजस’ रेल्वे धावणार आहे. ही रेल्वे भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) अंतर्गत चालवली जाईल. 17 जानेवारी 2020 पासून मुंबई-अहमदाबाद तेजसची सुरुवात होणार असून आठवड्यातील गुरुवार सोडून ही रेल्वे सहा दिवस धावणार आहे. लखनऊ आणि दिल्ली दरम्यान देशातील पहिल्या खासगी ‘तेजस’ रेल्वेला लोकांनी पसंत केले होते. जागतिक दर्जाच्या सुविधायुक्त असलेल्या रेल्वेला उशीर झाल्यानंतर प्रवाशांना भरपाई देण्याची तरतूद आहे.

याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडे नऊ वाजता ‘तेजस’ अहमदाबादहून निघेल आणि मुंबई सेंट्रलला संध्याकाळी 4 वाजता पोहोचेल. संध्याकाळी 5:15 वाजता मुंबईहून रवाना होईल आणि अहमदाबादमध्ये रात्री 11:30 वाजता दाखल होईल. पश्चिम रेल्वे विभागांतर्गत ही रेल्वे धावेल.

18 कोच या नवीन तेजस एक्सप्रेसमध्ये असलील. दरम्यान 12 कोच असणारी रेल्वे सुरुवातीला चालवण्यात येणार आहे. यानंतर कोचची संख्या वाढवली जाणार आहे. अधिकाऱ्यांनी दावा केला की, जागतिक दर्जाच्या सुविधा प्रवाशांना रेल्वेत देण्यात येतील. चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर श्रेणीत वातानुकूलीत असलेल्या या रेल्वेत प्रवासी प्रवास करू शकतात. कोचमधील सीट्स आरामदायक बनवण्यात आल्या आहेत. यासोबत स्लाइडिंग कोच दरवाजा, ऑटोमॅटिक एंट्री आणि एक्झिट दरवाजे, पर्सनल रीडिंग लाइट, मोबाइल चार्गिंग प्वाइंट, अटेंडेंट कॉल बटन आणि बायो टॉयलेटची सुविधा आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून यात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. मुंबई ते अहमदाबाद प्रवासादरम्यान नवीन तेजस ट्रेनला एकूण सहा स्टॉप देण्यात आले आहेत. ही रेल्वे अहमदाबादहून निघाल्यावर नडियाद, वडोदरा, भरूच, सूरत, वापी आणि बोरीवली स्थानकांवर थांबा घेत मुंबई सेंट्रलला येईल.

Leave a Comment