आंदोलन काळात इंटरनेट बंद ठेवल्याने तासाला होते एवढ्या कोटींचे नुकसान


नवी दिल्ली – सध्या देशाच्या अनेक राज्यांमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या आणि एनआरसीच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहेत. काही ठिकाणच्या या आंदोलनांना हिंसक वळणही लागले आहे. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर तेथील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. पण मोबाईल आणि टेलिकॉम कंपन्यांना इंटरनेट सेवा बंद ठेवल्याने रोज कोट्यवधी रुपयांचा फटका बसत आहे.

सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार इंटरनेट देशाच्या अनेक भागांमध्ये बंद ठेवण्यात येत असल्यामुळे अडीच कोटी रुपयांचे प्रत्येक तासाला नुकसान होते आहे. कोणीही आंदोलनाच्या काळात अफवा पसरवू नये, चुकीची माहिती देऊन सामान्यांची दिशाभूल केली जाऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून काही राज्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येत आहे.

इंटरनेट सेवा बंद ठेवल्यामुळे सामान्यांनाही त्याचा फटका बसतो. विशेषतः प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांना त्याचा जास्त त्रास होतो. इंटरनेट बंद असल्यामुळे हवाई, रेल्वे प्रवासाची तिकीटे ऑनलाईन बुक करता येत नाही. ओला-उबर यासारख्या खासगी प्रवासी वाहनांचे बुकिंग करता येत नसल्यामुळे त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो.

लोक अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पैसे देतात. याच माध्यमातून रुग्णालयांमध्येही पैसे दिले जातात. पण इंटरनेट नसल्यामुळे अशा पद्धतीने पैसे अदा करणे शक्य होत नसल्याचे लोक सांगतात. यामुळे अनेक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसते.

Leave a Comment