येथे भरतो खराखुरा गाढव बाजार


कुणीही थोडा विचित्र वागत असले तर त्याला लगेच गाढवाची उपमा दिली जाते. एखाद्या ठिकाणी आपल्या मताशी सहमत न होणारी अनेक माणसे असतील तर आपण लगेच हा म्हणजे शुद्ध गाढवांचा बाजार आहे असे शब्द वापरतो. पण प्रत्यक्षात गाढव हा अतिशय काटक, कितीही श्रम विनातक्रार करणारा प्राणी आहे आणि त्यामुळे गाढवांना मागणी चांगली असते. यामुळे देशात अनेक ठिकाणी गाढव बाजार भरतात आणि तेथे गाढवांची खरेदी विक्री होते.

महाराष्ट्राच्या नांदेड जवळ मालेगाव येथे गेली ३५० वर्षे पशु बाजार भरतो. हा राजस्थानातील पुष्कर मेळ्यानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा पशु बाजार असून येथे अन्य पशुबरोबर गाढवे मोठ्या संख्येने विक्रीसाठी येतात. गाढवांच्या किमती असून असून किती असतील असे आपल्याला वाटत असले तर हे नक्कीच कळले पाहिजे की आजकाल गाढवांच्या किमती सुद्धा वाढल्या असून त्या ३० ते ३५ हजारापर्यंत आहेत. येथे नटवून सजवून, रंगवून गाढवे विक्रीसाठी आणली जातात.


येथे गेली वीस वर्षे गाढवांचा व्यापार करणारे व्यापारी सांगतात, पूर्वी ५ हजारात गाढव विकले जात असे मात्र आता गाढवांची संख्या कमी होत आहे आणि मागणी कायम असल्याने त्याच्या किमती २५ ते ३५ हजारापर्यंत आहेत. या बाजाराचे विशेष म्हणजे येथे गाढवे उधारीवर खरेदी करता येतात. म्हणजे या वर्षी गाढव खरेदी करायचे आणि पुढच्या वर्षी पैसे द्यायचे. पूर्वी हप्त्याने सुद्धा गाढव विक्री होत असे. गाढवे साधारण सामान वाहून नेण्यासाठी वापरली जातात आणि डोंगराळ तसेच शहरी भाग अशी कुठल्याही ठिकाणी ती काम करू शकतात.

महाराष्ट्र शासनाने गाढवांची कमी होत चाललेली संख्या लक्षात घेऊन राज्याच्या पशुपालन विभागाला गाढवांच्या संरक्षणाची उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. २०१२ मध्ये झालेल्या पशु शिरगणतीमध्ये गाढवांची संख्या महाराष्ट्रात २९३१५ होती आणि गतवेळेपेक्षा ती ९ टक्क्यांनी कमी झाली होती.

Leave a Comment