भारतातील मुस्लिम समुदाय खूप आनंदी आणि आदराने राहत आहे


सध्या देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून त्याविरोधात अनेक राज्यात आंदोलने केली जात आहेत. या कायद्याचा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीदेखील विरोध केला आहे. त्यांनी ट्विट करत आपला विरोध दर्शवला होता. बॉलिवूड गायक अदनान सामीने त्यांच्या या ट्विटला उत्तर दिले असून त्याने भारतातील मुस्लिम आनंदी असल्याचे म्हणत टोला लगावला आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून धार्मिक छळामुळे भारतात आलेल्या हिंदू, शीख, पारशी, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन नागरीकांना सुधारित नागरिकत्व कायद्यातंर्गत भारतीय नागरीकत्व बहाल करण्यात येणार आहे.

पाकिस्तानातील नागरिकांनो, सुधारित नागरिकत्व कायद्यासंबंधी चर्चेत जे स्वत:हून सहभागी झाले आहेत. तुम्ही जर मुस्लिमांची बाजू मांडत आहात तर सर्वात आधी मान्य करा की त्यांना तुमचा देश सोडायचा होता. त्याचबरोबर ते तुमचे अस्तित्वच नाकारत आहेत. मुस्लिमांची जर तुम्हाला एवढीच चिंता आहे तर मग त्यांच्यासाठीतुमच्या सीमारेषा सुरु करा अन्यथा शांत राहा, असे अदनानने ट्विटमध्ये म्हटले आहे.

अदनानने त्यानंतर दुसरे ट्विट करत त्यामध्ये भारतातील मुस्लीम समुदाय खूप आनंदी आणि आदराने भारतात राहत असल्याचे ऐकून कदाचित तुम्हाला वाईट वाटत असेल असे म्हणत इम्रान यांना टोला लगावला आहे. काही दिवसांपूर्वी इम्रान यांनी केलेल्या ट्विटमध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क कायद्याच्या सर्व नियमांचे तसेच पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय कराराचे भारताच्या नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे उल्लंघन होत असल्याचे म्हटले होते. मोदी सरकार आणि भाजपची पितृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर त्यांनी हल्लाबोल केला होता. भारताच्या ‘हिंदू राष्ट्र’ संकल्पनेचा नागरिकत्व सुधारणा विधेयक हा एक भाग असल्याचा दावा इम्रान यांनी केला.

Leave a Comment