संभाजीराजेंचा आरोप, रायगड किल्ला संवर्धनाच्या कामात टक्केवारी काढण्याचे प्रयत्न


कोल्हापूर – रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजी राजे यांनी रायगड प्राधिकरणाच्या बैठकीनंतर अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना रायगड किल्ला संवर्धनाच्या कामात खाबूगिरी आणि बाबूगिरीचा शिरकाव झाल्याचा आरोप केला आहे. पुरातत्व विभागाकडून प्राधिकरणाच्या माध्यमातून केली जाणारी कामे रोखली जात आहेत. त्याचबरोबर त्यांनी महाड ते पाचाड मार्गाच्या कामात टक्केवारी घेतली जात असल्याचा, खळबळजनक आरोपही केला आहे. आपण यांसदर्भात संबधित विभागांशी पुराव्यासह पत्रव्यवहार करणार असल्याचेही यावेळी जाहीर केले.

प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगड किल्ल्यावर करण्यात येणाऱ्या कामांना कार्यारंभाचे आदेश दिल्यानंतर काम थांबविण्याचे आदेश पुरातत्व विभागाने दिले आहेत. पुरातत्व विभागाने किल्ल्याच्या संवर्धनाचे काम करायचे असून प्राधिकरणाच्या विशेष विभागाने इतर काम करण्याचे दिल्ली येथे प्रधानमंत्री कार्यालयातील बैठकीत ठरले होते. त्यानुसार प्राधिकरणाने काही कामे सुरु केली होती. पण ती कामे पुरातत्व विभागाने थांबवली असून ते पूर्णपणे चुकीचे असल्याची नाराजी संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर कुठलीही परवानगी न घेता रायगड प्राधिकरण तसेच संबधित यंत्रणांकडून रायगड रोप-वे च्या संचालकांकडून विस्तारीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी बांधकामही करण्यात आले आहे. विशेष म्हणजे रोप वेचा प्रस्ताव रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रलंबित आहे. ५० कोटी रुपयांची तरतुद त्यासाठी रायगड संवर्धन आराखड्यात करण्यात आली आहे. असे असताना खासगी रोप-वेला प्राधिकरणाला अंधारात ठेऊन परवानगी देण्याचा घाट पुरातत्व विभागाने परस्पर घातल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तात्काळ हे काम थांबले पाहीजे. गडावर येणाऱ्या शिवभक्तांची रोप वे संचालकांकडून लूट सुरु असून ती थांबली पाहिजे, असे यावेळी संभाजीराजेंनी म्हटले आहे.

महाड ते पाचाड दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले आहे. दोन वर्ष निविदा प्रक्रीया पुर्ण होऊन झाली तरी ठेकेदाराने काम सुरु केले नाही. या ठिकाणी आता दोन उप कंत्राटदार नेमण्याचा घाट महामार्ग प्राधिकरणाने घातला आहे. टक्केवारी यात कामात काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे, त्यांनी यावेळी त्यांनी सांगितले. महामार्गाच्या कामात टक्केवारी होणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नसल्याचे म्हणत त्यांनी यावेळी महामार्ग प्राधिकरणावर निशाणा साधला.

Leave a Comment