मनसे नगरसेविकेचा अमृता फडणवीसांना राजकीय सल्ला


पुणे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ‘ठाकरे’ आडनावावरुन देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेच्या वादात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील उडी घेतली असून मनसेच्या पुण्यातील नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे यांनी अमृता फडणवीस यांना ‘बाई जरा दमान घ्या’, असा खोचक सल्ला दिला आहे.

फेसबुक पोस्टमधून अमृता फडणवीस यांच्यावर रुपाली ठोंबरे यांनी टीका केली आहे. ठाकरे नाव लावून ठाकरे होता येत नाही हे बोलणाऱ्या डोक्यावर पडल्या असल्याचा खोचक टोला ठोंबरे यांनी लगावला आहे. मिसेस मुख्यमंत्री म्हणून मिरवल्या आता जरा भानावर या, असेही ठोंबरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अमृता फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यासाठी केलेल्या ट्विटचा आधार घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. अमृता फडणवीस यांनी केवळ ठाकरे आडनाव लावल्याने कुणी ठाकरे होत नाही. त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावे लागते, अशा आशयाचे ट्विट केल्यानंतर अमृता फडणवीसांवर जोरदार टीका सुरु झाली. अमृता यांनी केलेल्या ट्विटबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आल्यावर अमृता फडणवीस यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व असून त्यांना त्यांची मते असल्याचे म्हणाले होते. मनसे नगरसेविका रुपाली ठोंबरे यांनी देखील फडणवीसांच्या या विधानाचाही फेसबुक पोस्टमधून समाचार घेतला आहे. ठोंबरे यांनी अमृता फडणवीस यांना राजकारणात येण्याचा सल्ला दिला.

Leave a Comment