पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर होणार गद्दारांवर शिस्तभंगाची कारवाई


जळगाव – 4 दिवसांपूर्वी आपण भाजपचे ज्येष्ठ नेते जे. पी. नड्डा यांची भेट घेतली असून विधानसभा निवडणूक, राज्यातील राजकीय परिस्थिती संदर्भात या भेटीत चर्चा केली. विधानसभा निवडणुकीत भाजपला स्वकियांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने फटका बसल्याची माहितीही दिली. नड्डा यांनी माझे म्हणणे ऐकून घेत चौकशीअंती जे दोषी असतील, त्या गद्दारांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.

गुरुवारी सायंकाळी एकनाथ खडसे लेवा एज्युकेशनल युनियनच्या शताब्दी महोत्सवाच्या समारोप समारंभासाठी जळगावला आले होते. त्यांनी या समारंभानंतर माध्यमांशी संवाद साधला. खडसे पुढे म्हणाले, ज्या घटना राज्याच्या काही भागात घडल्या आहेत, जे. पी. नड्डा यांना त्यांचीही माहिती देण्यात आली आहे. आपल्याच कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विरोधात काम केल्यामुळे काही ठिकाणी जागांवर पराभवाचा धक्का बसला. माझे म्हणणे पक्ष श्रेष्ठींनी ऐकून घेतले आहे. मी दिलेली माहिती तसेच पक्षाकडे असलेली माहितीच्या आधारे चौकशी करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. नड्डा यांनी त्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार तसेच पंकजा मुंडेंना भेटीसाठी दिल्लीत बोलावले आहे. नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलावले जाणार आहे.

सर्वांच्या उपस्थितीत चर्चा करून चांगला निर्णय घेऊ. चौकशीत जे दोषी असतील, त्यांच्यावर निश्चितच शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आश्वासन नड्डा यांनी दिल्याचे खडसे म्हणाले. दरम्यान, खडसे यांनी पक्षांतराच्या मुद्द्यावर बोलणे टाळले. उद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना त्यांनी ‘तो त्यांचा विषय आहे. मी काय बोलू’, असे सांगितल्यामुळे खडसेंच्या पक्षांतराचा मुद्दा मागे पडल्याचे संकेत मिळत आहेत.

खडसेंना पक्षाच्या भूमिकेसंदर्भात विचारणा केली असता म्हणाले की, पक्षाविरोधात कारवाया करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे, ही आपली अपेक्षा आहे. आता मी पक्षाच्या भूमिकेसंदर्भात समाधानी आहे किंवा नाही हे कारवाईनंतरच कळेल, असेही खडसे यावेळी म्हणाले.

Leave a Comment