बॉलीवूड सेलिब्रेटींच्याविरोधात ख्रिश्चन धर्मीयांच्या भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार दाखल


पंजाबच्या अमृतसर येथील ख्रिश्चन समुदायाकडून बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन, कॉमेडी क्विन भारती सिंग आणि चित्रपट निर्माती, कोरिओग्राफर फराह खान यांच्याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ख्रिश्चन धर्माबद्दल एका कार्यक्रमादरम्यान काही शब्द उच्चारल्यामुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा कार्यक्रम ख्रिसमसच्या दिवशी प्रसारित करण्यात आला होता. याबाबतची माहिती देताना डीएसपी सोहन सिंग यांनी सांगितले, की रवीना टंडन, फराह खान आणि भारती सिंग यांच्याविरोधात आम्हाला तक्रार मिळाली असून त्यांनी या तक्रारीत ख्रिश्चन धर्मातील लोकांच्या भावना दुखावल्या असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या विरोधात या प्रकरणी कलम २९५ – अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसएसपी विक्रम जीत दुग्गल यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

ख्रिश्चन संघटनेद्वारे करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की फराह खानने भारती सिंग आणि रवीनाला इंग्रजी शब्द लिहण्यास सांगितले होते. दोघींनी ब्लॅकबोर्डवर या शब्दाचे स्पेलिंग लिहिले. हा शब्द पवित्र बायबलमधून घेतला गेला आहे. रवीनाने स्पेलिंग बरोबर लिहिले होते. मात्र, भारतीने चुकीचे लिहिले होते. तिला या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता. तरीही तिने या शब्दाची खिल्ली उडवली. तिच्या या खिल्लीमध्ये फराह आणि रवीनादेखील सहभागी झाल्या होत्या. ख्रिश्चन समुदायाकडून या तिघींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Leave a Comment