ग्रहणाविषयी देशोदेशीच्या समजुती, गैर समजुती


२६ डिसेंबरला वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण झाले. जगाच्या अनेक देशात ते दिसले आणि पाहिलेही गेले. ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे हे आता सर्वांनाच माहिती असले तरी जगभर ग्रहणाबद्दल अनेक समजुती, गैरसमजुती आहेत आणि आजही त्या मानल्या जातात.


विकसित आणि पुढारलेला देश अशी मान्यता असलेल्या अमेरिकेत ग्रहणाबाबत अशी समजूत आहे की प्रचंड मोठे अस्वल सुर्याला गिळते तेव्हा सूर्यग्रहण होते आणि चंद्राला गिळते तेव्हा चंद्रग्रहण होते. भारतात ग्रहण अशुभ मानले जाते. या काळात खाणेपिणे वर्ज असते तसेच गर्भवती महिलांना घराबाहेर पडणे वर्ज असते. या काळात भारतात गंगास्नान, ध्यानधारणा करण्याची प्रथा आहे. ग्रहण काळात हवा दुषित होते असाही समज आहे. भारतात राहू केतू सूर्य गिळतात त्यामुळे ग्रहण होते असे मानले जात असे.


आफ्रिकेच्या बाताममालिबा समाजात असा समज आहे, की चंद्र आणि सूर्य यांचे युध्द म्हणजे ग्रहण. ग्रहण ही जुनी भांडणे संपविण्याची संधी मानली जाते. लोक एकत्र येतात, भांडणे विसरतात आणि चंद्र सुर्यालाही भांडण विसरा अशी विनंती करतात. चीन मध्ये सूर्यग्रहण म्हणजे ड्रॅगन सुर्याला गिळतो असा समज आहे. या ड्रॅगनला घाबरविण्यासाठी आकाशात बाण सोडले जातात, जोरजोरात आवाज केले जातात आणि उजेड पडावा म्हणून आतषबाजी केली जाते. चीनमध्ये १९ व्या शतकापर्यंत सूर्यग्रहण लागले की चीनी सेना आकाशात तोफेचे गोळे उडवीत असे असेही सांगतात.


मेक्सिकोमध्ये ग्रहण म्हणजे सूर्याचा राग आणि नाराजी समजली जाते. सूर्य रागावतो आणि आकाश सोडून जातो, राग शांत झाला की पुन्हा येतो असे मानले जाते. सूर्य परत आला की त्याला धन्यवाद दिले जातात. स्कँडेनेव्हिया मध्ये दोन लांडगे सूर्य आणि चंद्राचा पाठलाग करतात, चंद्राला पकडले तर चंद्रग्रहण आणि सुर्याला पकडले तर सूर्यग्रहण होते असे मानले जाते. कोरिया मध्ये ग्रहण राजाने दिलेल्या आदेशाचा परिणाम मानले जाते. राजाने एका कुत्र्याला चंद्र चोरून आण असा आदेश दिला होता मात्र कुत्र्याला चंद्र सापडला नाही तेव्हा त्याने सूर्याचा काही भाग चोरून आणला असे मानले जाते.

Leave a Comment