उबरला ट्राविक क्लानिक यांचा रामराम


कॅब सेवा क्षेत्रात अल्पावधीत ६५ देशातून ७०० पेक्षा अधिक शहरात विस्तार झालेल्या उबरचे सहसंस्थापक ट्राविक क्लानिक यांनी उबरला रामराम करत असल्याचे जाहीर केले आहे. गेली १० वर्षे ते उबरशी जोडलेले होते मात्र आता ते नवीन व्यवसाय आणि सामाजिक कार्याकडे अधिक लक्ष पुरविता यावे यासाठी उबर सोडत असल्याचे सांगितले जात आहे. ट्राविक क्लानिक यांनी गॅरेट कॅम्प याच्यासह २०१० मध्ये उबरकॅब नावाने टॅक्सीसेवा सुरु केली होती.

ही सेवा सुरु करण्यामागचे कारण म्हणजे ट्राविक क्लानिक २००८ साली पॅरीसला गेले होते तेव्हा त्यांना टॅक्सी मिळण्यात प्रचंड अडचण आली होती आणि त्यातून अॅप आधारित टॅक्सीसेवा सुरु करण्याची कल्पना त्यांना सुचली. त्यातून उबरचा जन्म झाला. सुरवातीला उबरकॅब असे नाव या सेवेला दिले गेले मात्र नंतर ते उबर करण्यात आले. अर्थात ट्राविक क्लानिक यांनी या वर्षाच्या नोव्हेंबर मध्ये त्यांचा कंपनीतील बराच मोठा हिस्सा विकला होता.

ट्राविक क्लानिक यांनी २०१० मध्ये १०१०० नावाने गुंतवणूक कंपनी सुरु केली आहे. ही कंपनी रिअल इस्टेट, ई कॉमर्स, भारत, चीन देशातील स्टार्टअप कंपन्या, नवउद्योजक यांच्यासह विविध क्षेत्रात गुंतवणूक करते. याशिवाय त्यांनी भाडेतत्वावर स्वयंपाकघर उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय सुरु केला असून त्यासाठी क्लाउड किचन या नावाची कंपनी सुरु केली आहे. उबरमध्ये काम करत असताना त्याच्यावर २०१७ साली लैगिक छळ केल्याचा आरोप झाला होता तेव्हा त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Leave a Comment