या स्पेशल हॉस्पिटलमध्ये फक्त उंटांवर होतात उपचार


जगात अनेक प्रकारची हॉस्पिटल्स आहेत. ज्यात माणसे, कुत्री, अन्य प्राणी यांच्यासाठी विशेष हॉस्पिटल बांधली गेली आहेत. मात्र फक्त ऊंटांवर उपचार करणारे अत्याधुनिक हॉस्पिटल जगात एकाच ठिकाणी आहे. दुबई येथे हे कॅमल हॉस्पिटल ७१ कोटी रुपये खर्च करून बांधले गेले असून त्याचे काम २०१७ मध्ये सुरु झाले होते. हे पंचतारांकित हॉस्पिटल जगभर प्रसिद्ध झाले असून येथे केवळ युएई मधूनच नाही तर ओमान मधूनही उंट उपचारासाठी आणले जातात. या हॉस्पिटलमध्ये ६५ तज्ञ काम करतात.


या हॉस्पिटल मध्ये एकावेळी २२ ऊंटांवर उपचार होऊ शकतात. ऊंटांवर शस्त्रक्रिया करायची असेल तर किमान ७२ हजार रुपये खर्च येतो आणि अल्ट्रासाऊंडसाठी हाच खर्च ८ हजार रुपये आहे. या हॉस्पिटल मध्ये ५ मीटर उंचीची एन्डोस्कोपी मशीन आहे. अश्या मशीन जगात तीन ठिकाणी आहेत. त्यातील दोन अमेरिकेत असून तेथे एकीचा वापर देवमाश्यांसाठी तर दुसरी जिराफांसाठी वापरली जाते. दुबई कॅमल हॉस्पिटल मध्ये मॅरेथॉन स्पर्धेत धावताना पडून जखमी झालेले, हाडे मोडलेले उंट प्रामुख्याने उपचारासाठी येतात. काही वेळा ऑपेरेशन थियेटर मध्ये उंटाला उलटे लटकावून ऑपरेशन केले जाते. हे काम फार जिकीरीचे असते.

दुबई येथे दरवर्षी होणाऱ्या उंटांच्या रेस जगभर प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. विजेत्यांना अब्जावधी रुपयांची बक्षिसे दिली जातात. यंदाच्या अल मरमुम हेरिटेज फेस्टिव्हल मध्ये रेस जिंकणाऱ्या उंटांच्या मालकांना २.८६ अब्ज रुपयांचे पुरस्कार दिले गेले होते.

Leave a Comment