जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये होणार आयपीएल २०२०चा अंतिम सामना


आयपीएलचे लिलाव पार पडल्यानंतर आता आयपीएल २०२० साठीच्या हालचालीनी जोर पकडला असून त्यासाठी होणारे कार्यक्रम, सामने, आयोजन याची आखणी सुरु झाली आहे. दरम्यान आयपीएल २०२० मेगाफायनल ऐतिहासिक बनविण्यासाठी हा सामना जगातील सर्वात मोठ्या स्टेडियम मध्ये खेळविण्याच्या हालचाली सुरु झाल्या असल्याची खबर आहे. प्राथमिक माहितीनुसार या स्पर्धा १ एप्रिल पासून सुरु होतील.

जगातील सर्वात मोठे स्टेडियम अहमदाबाद मध्ये बनते आहे आणि त्याचे काम नवीन वर्षाच्या सुरवातीला पूर्ण होणार आहे. पूर्वीच्या मोटेरा स्टेडियमचेच नुतनीकरण करून हे भव्य स्टेडियम उभारले जात असून त्याची प्रेक्षक क्षमता १ लाख १० हजार आहे. या स्टेडियमला सरदार वल्लभभाई पटेल असे नाव दिले जात आहे. बीसीसीआयने याच स्टेडियम मध्ये आयपीएलचा अंतिम सामना व्हावा यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. असे झाले तर कोणत्याही टी २० सामन्यासाठी प्रेक्षक संख्येचे रेकॉर्ड नोंदविले जाईल.

पाच वर्षापूर्वी गुजराथ क्रिकेट असोसिएशनने या स्टेडियमच्या पुनर्निमाण कामाची सुरवात केली होती. स्टेडियमचे उद्घाटन भारत आणि वर्ल्ड ११ मधील सामन्याने व्हावे यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. हे स्टेडियम ६४ एकर परिसरात असून त्यात ७६ कॉर्पोरेट बॉक्स, ४ ड्रेसिंग रूम, ३ सराव मैदाने, ऑलिम्पिक पात्रतेचा जलतरण तलाव, इंडोअर क्रिकेट अकादमी, स्क्वॅश एरिया व टेबल टेनिस एरिया आहे.

Leave a Comment