लष्कराच्या डॉग स्क्वाडसाठी सर्व्हीलांस सिस्टीम तयार


भारतीय लष्कराने जवानांच्या बरोबरीने महत्वाची भूमिका बजावण्यात माहीर असलेल्या त्यांच्या डॉग स्क्वाडसाठी बुलेटप्रुफ जॅकेट्स आणि ऑडीओ व्हिडीओ सर्वेलांस सिस्टीम विकसित केली आहे. या सिस्टीमच्या मदतीने हे स्वाकेड चकमकी अथवा खास कारवाईच्या वेळी महत्वाची भूमिका पार पाडू शकेल असे सांगितले जात आहे. प्रत्यक्ष गोळीबार होत असेल तरी ही प्रशिक्षित कुत्री शत्रूच्या निकट जाऊ शकतील आणि सर्व्हेलन्स सिस्टीमच्या मदतीने शत्रूचे लोकेशन व अन्य महत्वपूर्ण माहिती पुरवितील.

या संदर्भात बोलताना आर्मी डॉग युनिटचें अध्यक्ष लेफ्ट. कर्नल व्ही कमलराज म्हणाले, आमच्याच युनिटने ही विशेष प्रणाली विकसित केली आहे. आर्मी अनेक प्रकारच्या कामांसाठी कुत्र्यांना प्रशिक्षित करते. हे श्वान पथक अनेक अवघड कामगिऱ्या पार पाडताना महत्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे आमच्या या साथीदारांचे संरक्षण ही आमची जबाबदारी आहे. त्यांच्याबाबत कोणतीही जोखीम आम्ही घेऊ शकत नाही. यामुळे त्यांना बुलेटप्रुफ जॅकेट्स दिली गेली आहेत.

त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाने युक्त अशी सर्वेलांस सिस्टीम बनविली गेली आहे. यामुळे आमचे श्वान पथक हेरगिरीसुद्धा करू शकणार आहे. त्यांच्या पाठीवर कॅमेरा व ट्रांसमीटर रिसिव्हर बसविले जातात आणि त्यांच्या सहाय्याने ही कुत्री आम्हाला महत्वाची माहिती पोहचवित राहतील. धोकादायक कामगिरीमध्ये प्रत्यक्ष सैनिकांना शत्रूशी सामना करावा लागला तरी आमचे श्वान पथक त्यासंदर्भातली माहिती अगोदरच पाठवेल. कुत्र्याच्या पाठीवर जे अॅप त्यासाठी बसविले जाते त्याला इंटरनेटची गरज नाही. अगदी काही अडथळा आला तरी १ किमी परिसरातील माहिती हे श्वान देत राहतील.

Leave a Comment