अनेक रहस्ये पोटात साठविलेली आगम विहीर


बिहारची राजधानी पाटणा अनेक कारणांनी चर्चेत राहत असले तरी हे एक सुंदर आणि अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेले शहर आहे. पूर्वीचे या शहराचे नाव पाटलीपुत्र असे होते आणि सम्राट अशोकाची ही राजधानी होती. या शहरात आजही अनेक ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात त्यातील एक आहे आगम विहीर. या विहिरीला रहस्यमयी म्हटले जाते कारण हिच्या पोटात अनेक रहस्ये दडलेली आहेत. शहरातील पुरातत्व वास्तूपैकी ही एक आहे.

मौर्य शासक सम्राट अशोकाचे हे यातनागृह होते असे सांगितले जाते. इतिहास सांगतो अशोकाने राज्यावर येण्यासाठी त्याच्या ९९ भावांच्या शिरच्छेद करून त्यांची प्रेते या विहिरीत टाकली होती. आणखी एका कथेनुसार चांद राजाने सुदर्शन नावाच्या जैन क्षपणकाला या विहिरीत फेकले होते. पण तो बुडून मेला तर नाहीच पण कमळावर बसून तो तरंगत वर आला होता.


लग्न अथवा अन्य धार्मिक कार्यात या विहिरीचे महत्व मोठे आहे. हिंदू धर्मीय या विहिरीत चमत्कारिक शक्ती असल्याचे मानतात. या विहिरीचे पाणी कधीच आटत नाही असा अनुभव आहे. याचे कारण असेही सांगितले जाते की बंगालच्या गंगासागरचे पाणी येथे येत असते. असेही सांगतात एका ब्रिटीश अधिकाऱ्याची छडी गंगासागर मध्ये पडली ती या विहिरीत तरंगत आली होती. ही छडी आजही कोलकाता संग्रहालयात पाहायला मिळते.

विहिरीच्या जवळ शितलामाता मंदिर असून हे मंदिर प्रसिध्द आहे. आगम विहीर फक्त दिवसा पाहता येते. त्यामुळे ज्यांना इतिहासाची किंवा रहस्याची आवड आहे त्यांनी या विहिरीला जरूर भेट द्यावी.

Leave a Comment