अध्यात्म आणि विज्ञान दोन्हीसाठी महत्वाचे आहे सूर्यग्रहण


आज वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण होत असून ते कंकणाकृती दिसणार आहे. सूर्यग्रहण ही खगोलीय घटना आहे. विज्ञानामुळे सूर्यग्रहण कसे आणि का होते याची उत्तरे आज आपल्याला मिळाली आहेत. मात्र जेव्हा विज्ञान इतके प्रगत नव्हते तेव्हा म्हणजे ऋग्वेद काळातसुद्धा अनेक ग्रंथात ग्रहणांचे वर्णन मिळते. त्यात ग्रहणाची धार्मिक बाजू दिसते. ऋषीमुनिना ग्रह नक्षत्रे यांचे ज्ञान फार पूर्वीपासून होते. महर्षी अत्री यांना ग्रहणाविषयी ज्ञान देणारे पहिले आचार्य मानले जाते. ऋग्वेदाच्या एका ऋचे मध्ये ग्रहणांचे वर्णन आले आहे.

मत्स्यपुराणात सूर्यग्रहणाचा संबंध राहू केतूशी लावला गेला असून अमृतमंथनाची कथा त्याच्याशी जोडली गेली आहे. असेही मानले जाते की महाभारत युद्धात सुद्धा सूर्यग्रहण झाले होते. अर्जुनाने जयद्रथ वधाची प्रतिज्ञा केली आणि सूर्यास्तापूर्वी त्याचा वध करेन अन्यथा स्वतः मरेन असे तो म्हणाला. तेव्हा मध्येच अंधार पडल्याचे व पुन्हा सूर्य चमकू लागल्याचे जे वर्णन आहे ते सूर्यग्रहणाचे आहे असे आता सिद्ध झाले आहे.

वर्षातून तीन अथवा त्यापेक्षा अधिकवेळा सूर्यग्रहण झाले तर ते अशुभ मानले जाते. यामुळे नैसर्गिक संकटे, सत्ता परिवर्तन, नुकसानी, आजार, आर्थिक स्थितीत चढउतार असे परिणाम होतात असे ज्योतिषशास्त्र सांगते. विज्ञानाच्या मते चंद्र जेव्हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येऊन सुर्याला झाकतो तेव्हा सूर्यग्रहण होते.

Leave a Comment