नाताळ खास करण्यासाठी या ठिकाणांना द्या भेटी


नाताळ आता अगदी तोंडावर आला आहे. नाताळला जोडून सुट्ट्या आल्याने अनेकांनी आपले नाताळसाठीचे प्लॅन आखले असतील. हे दिवस पर्यटनासाठीही फार चांगले असतात. नाताळचा उत्साह उपभोगायचा आहे व पर्यटनही करायचे असेल तर भारतातील पाच ठिकाणे तुमच्यासाठी अगदी योग्य ठरतील. या ठिकाणी नाताळचे सेलिब्रेशन पाहता येईलच पण नाताळसाठी बनविलेल्या खास पदार्थांचा आस्वाद घेता येईल तसेच शॉपिंगची मजाही लुटता येईल.


गोव्यातील नाताळ हा नेहमीच खास असतो. एकतर येथे ख्रिश्चन समाज मोठा आहे आणि जागतिक कीर्तिची अनेक चर्च येथे आहेत. पारंपारिक पद्धतीने साजरा होणारा नाताळ शिवाय लेट नाईट पार्ट्या, म्युझिक यांचा आनंद येथे उपभोगता येईल. नाताळ निमित्ताने गोव्यातील रस्ते, गल्लयाही लाईटच्या माळांनी व विशेष सजावटीने नटलेल्या असतात. दुसरे ठिकाण म्हणजे केरळ. येथेही ऐतिहासिक चर्च आहेत. रस्त्यांवरील नेत्रदिपक विद्युत रोषणाईला केरळची हिरवाई अधिकच सुंदर करून टाकते. त्यामुळे येथेही नाताळात जाणे अधिक अ्रानंददायी बनते.

मुंबईत तर नाताळचा सण विशेष उत्साहात साजरा होतो. सजावटीबरोबरच विविध प्रकारचे बेकरी पदार्थ, खास पेस्ट्री केक्स, मफिन्स यांच्या मनसोक्त स्वाद चाखता येतोच पण येथे नाताळचे शॉपिंग हाही एक खास कार्यक्रम म्हणता येईल. पाँडिचेरी या नितांतसुंदर गावातला नाताळही असाच आगळा असतो. सुंदर समुद्रकिनारा सुटीचा आनंद द्विगुणित करतोच पण या शांतताप्रिय गावात शांती व नाताळचे सेलिब्रेशन यांचा मस्त मेळ जुळतो तो अनुभवायला हवा. पाचवे ठिकाण म्हणजे दिल्लीतील कॅनॉट प्लेस- येथील रेस्टॉरंटस नाताळची संध्याकाळ खास बनविणार याची पूर्ण खात्रीच येथे असते.

Leave a Comment