या मंदिरात आहेत बिनसोंडेचे गणपतीबाप्पा


कोणतेही मंगल कार्य करण्यापूर्वी गणेश पूजन करण्याची प्रथा आजही आवर्जून पाळली जाते. यामुळेच भारतभर गणेश मंदिरे आहेतच पण परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर गणेश मंदिरे दिसतात. गणेशचे मुख हत्तीचे आहे म्हणून त्याला गजमुख असेही म्हणतात आणि बहुतेक मंदिरात बाप्पाचे रूप सोंड असलेले असेच असते. जयपूर मधील गढगणेश मंदिरात मात्र बिनसोंडेचे गणपतीबाप्पा विराजमान आहेत. या मंदिरात गणेशाच्या बालरुपाची पूजा केली जाते. बुधवारी या मंदिरात खूप गर्दी होते. मंदिर आरवली पर्वताच्या रांगामधील एका उंच पहाडावर असून सुमारे ५०० मीटरची चढण त्यासाठी चढावी लागते.

उंच पहाडावर असलेले हे मंदिर दुरून एखाद्या मुकुटाप्रमाणे दिसते. मंदिरात गेल्यावर आजूबाजूला पसरलेल्या जयपूर शहरचे मनोरम दृश्य पाहता येते. मंदिरातील गणेश प्रतिमेचा फोटो काढण्यास मात्र बंदी आहे.

हे मंदिर जयपूरचे राजे सवाई जयसिंग द्वितीय यांनी बांधले आहे. त्यांनी या पहाडाच्या पायथ्याशी अश्वमेध यज्ञ केला होता त्यावेळी तांत्रिक विधीने या मंदिराची स्थापना केली गेली असे सांगतात. गणेश चतुर्थीच्या दुसरे दिवशी येथे मोठा मेळा भरतो. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे जयपूरचा राज परिवार ज्या महालात राहतो, त्या चंद्रमहालाच्या वरच्या मजल्यावरून मंदिरातील मूर्तीचे दर्शन घडते.

पूर्वीचे राजे महाराजे गढ गणेशाचे दर्शन घेऊनच रोजच्या कामाची सुरवात करत असत. या गणेश मंदिरात उंदरांच्या दोन मोठ्या प्रतिमा बसविल्या गेल्या असून दर्शनांसाठी येणारे भाविक त्यांच्या मनोकामना या उंदरांच्या कानात सांगतात.

Leave a Comment