नवीन वर्ष स्वागताच्या अजब प्रथा


नवीन वर्षाचे स्वागत सर्वच ठिकाणी हर्षोल्हासात होते. नवीन वर्षाची सुरवात जोरदार आतषबाजीने केली जाते मात्र जगातील काही देशात नवीन वर्षाचे स्वागत अजब प्रथा पाळून केले जाते. त्याची ही मनोरंजक माहिती आमच्या वाचकांसाठी.


ग्रीस मध्ये नवीन वर्ष सुरु होण्याच्या मध्यरात्री घरातील आणि बाहेरचे दिवे बंद केले जातात. उघड्या डोळ्यांनी नैसर्गिक प्रकाशात येथे नववर्षाचे स्वागत केले जाते. नववर्षासाठी घरोघरी एक विशेष प्रकारचा केक तयार केला जातो. त्यात एक नाणे घातले जाते. हे नाणे ज्याच्या वाट्याला येईल त्याला नवीन वर्ष फलदायी होणार असा समज आहे. क्युबा मध्ये ज्यांना भटकंतीची विशेष आवड आहे असे लोक नवीन वर्ष सुरु होण्याच्या मध्यरात्री सुटकेस घेऊन घराबाहेर चक्कर मारतात. यामुळे वर्षभरात प्रवासाच्या अनेक संधी येतात असा समज आहे.

इक्वाडोरमध्ये नवीन वर्ष सुरु होण्याच्या मध्यरात्री जे लोक फारसे आवडत नाहीत त्यांचे पुतळे जाळले जातात. यामुळे नकारात्मक उर्जेपासून सुटका होते असा समज आहे. विशेष म्हणजे पनामा, पेराग्वे कोलंबिया या देशात सुद्धा ही प्रथा असून जाळले जाणारे पुतळे बहुदा राजकारणी लोकांचे असतात.


रशियात आपली जी मनोकामना असेल ती एका कागदावर लिहून तो कागद जाळला जातो आणि त्याची राख शँपेनमध्ये घालून प्यायली जाते. जी इच्छा आपण मनात धरली ती पूर्ण होण्यासाठी वर्षभर त्यामुळे प्रेरणा मिळते अशी श्रद्धा आहे. चिली या निसर्गसुंदर देशात नववर्षाचे स्वागत आणखी वेगळ्या प्रकारे होते. नवीन वर्षाच्या एक दिवस अगोदर १ चमचा डाळ खाल्ली जाते. त्यामुळे पुढचे १२ महिने समृद्धीचे जातात असे मानतात. येथे नवीन वर्ष आपल्या मृत आप्तांच्या सोबत राहण्यासाठी काही जण या मृत आप्तांच्या कबरीजवळ रात्र काढतात.

Leave a Comment