दोन दिग्गज क्रिकेटपटू मुख्यमंत्र्यांच्या भेटासाठी ‘मातोश्री’वर


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि लिटिल मास्टर सुनील गावस्कर हे दोन दिग्गज क्रिकेटपटू ‘मातोश्री’वर दाखल झाले. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ हे खासगी निवासस्थान आहे. एकाच वेळी मातोश्रीवर हे दोन्ही माजी क्रिकेटपटू पोहोचल्याने अनेक तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत. दरम्यान, अद्याप या भेटीचे कारण समजू शकले नाही. त्यामुळे ही भेट राजकीय आहे की खासगी याबाबतचा तपशीलही बाहेर आला नाही.

याबाबतचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले असून अत्यंत नाट्यपूर्णरित्या राज्यात सत्तांतर झाले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे यांच्याकडे या सरकारचे नेतृत्व आले असून, या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून ते नेतृत्व करत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांना भेटणारी प्रत्येक व्यक्ती आणि भेट यावर प्रसारमाध्यमांचे बारीक लक्ष असते. उद्धव ठाकरे हे आजवर शिवसेना पक्षप्रमुख असल्यामुळे निवासस्थान ‘मातोश्री’ आणि शिवसेना भवन या दोन ठिकाणांहून शिवसेना या पक्षाचा गाडा ते हाकत. परंतू, ते आता मुख्यमंत्री झाल्यामुळे राज्यसकट आणि पक्ष संघटन अशा दोन्हींची जबाबदारी उद्धव यांना पार पाडावी लागणार आहे.


दरम्यान, या आधीही विविध लोक उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर जात असत. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून विविध विषय त्यांच्या कानावर घालत असत. पण ते मुख्यमंत्री झाल्यापासून निर्णयप्रक्रियेतही सहभागी झाले असल्यामुळे त्यांना भेटणाऱ्या लोकांचे आणि बैठकांचे महत्त्व अधिक वाढले आहे. सचिन तेंडूलकर आणि सुनील गावस्कर यांच्या भेटीमागेही असेच काही कारण असल्याची चर्चा रंगली आहे. पण, या भेटीतील तपशील बाहेर आल्यानंतरच अनेक बाबी पुढे येऊ शकतील.

Leave a Comment