…म्हणून त्या जर्मन विद्यार्थ्याला देश सोडण्याचे आदेश


नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (CAA) निषेधार्थ मद्रास आयआयटीच्या कॅम्पसमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या जर्मन विद्यार्थ्याला देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या विद्यार्थ्याचे नाव जेकब लिंथेंडल असे असून मद्रास आयआयटीत तो भौतिकशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे (मास्टर्स) शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी आयआयटी कॅम्पसमध्ये CAA आणि NRC विरोधात झालेल्या आंदोलनात त्याने सहभाग घेतला होता. यानंतर भारत सोडण्याचे आदेश जेकबला देण्यात आले आहेत.

या संदर्भातील वृत्त दि इंडियन एक्स्प्रेसने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार जेकबला याविषयी विचारणा करण्यात आली असता. जेकबने म्हटले की, आपल्याला यासंबधीचे तोंडी आदेश चेन्नईतील परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडून (एफआरआरओ) देण्यात आले. जेकब लिंथेंडलने मद्रास आयआयटीतील आंदोलनावेळी एक फलक झळकावला होता. त्यावर १९३३ ते १९४५ आम्ही याच परिस्थितीत होतो, असा सूचक संदेश लिहला होता. या माध्यमातून जर्मनीतील नाझी राजवट आणि भारतातील सद्यस्थितीची अप्रत्यक्ष तुलना करण्याचा प्रयत्न जेकबने केला होता. स्टुडंट एक्स्चेंज प्रोगामतंर्गत जेकब लिंथेंडल मद्रास आयआयटीत शिक्षण घेत होता. तो गेल्यावर्षी बंगळुरूमध्ये एका क्रीडास्पर्धेत भाग घेण्यासाठी आला होता. त्यावेळी ‘एफआरआरओ’कडून आपल्याला ईमेल आल्याचे त्याने म्हटले.

जेकबला बंगळुरूतून चेन्नईत परतल्यानंतर इमिग्रेशन अधिकाऱ्यांना भेटण्यास सांगण्यात आले. त्याला यावेळी त्याचे छंद आणि राजकीय विचारसरणीविषयी विचारणा करण्यात आली. सीएएविरोधी आंदोलनात मी का सहभागी झालो, याविषयी त्यांनी विचारले. यानंतर आम्ही आंदोलनाच्या संस्कृतीविषयी चर्चा केली. या बैठकीअंती अधिकाऱ्यांनी स्टुडंट व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तुला भारत सोडावा लागेल, असे सांगितले. त्यांना हे लिखीत स्वरुपात द्या, अशी मी मागणी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी मला माझा पासपोर्ट परत दिला. तसेच तुला लिखीत स्वरुपात आदेश मिळतील, असेही सांगितले. मात्र, आपल्याला कोणतेही पत्र मिळाले नसल्याचे जेकबने स्पष्ट केले.

Leave a Comment