भारताला जर हिंदू राष्ट्रच बनवायचे असेल तर संविधानच बदला


कोलकाता: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू आणि भाजपचे पश्चिम बंगालचे उपाध्यक्ष चंद्रकुमार बोस यांनीही नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुस्लिमांचा नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात समावेश का करण्यात आला नाही? असा सवाल करतानाच केवळ काही धर्मियांचा समावेश नागरिकत्व कायद्यात करण्यासाठी भारत हे काही हिंदू राष्ट्र नाही. जर भारताला तुम्हाला हिंदू राष्ट्रच बनवायचे असेल तर संविधानच बदला, असे म्हणत चंद्रकुमार बोस यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहे.


भाजपने नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीला पाठिंबा कोलकात्यात देण्यासाठी विशाल रॅलीचे आयोजन केले होते. चंद्रकुमार बोस यांनी या रॅलीनंतर भाजपवर जोरदार टीका केल्याने या मुद्द्यावरून भाजपमध्येही दोन गट पडल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. कुठल्याच धर्माशी संबंधित सीएए कायदा नसल्याचे सांगितले जात आहे, मग आम्ही हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी आणि जैनांवर का जोर देत आहोत. त्यात मुस्लिमांचा समावेश का केला जात नाही? आपल्याला पारदर्शी व्हायला हवे. मुस्लिमांचा त्यांच्या देशात छळ नाही झाला तर ते भारतात येणार नाहीत. त्यामुळे त्यांचा या कायद्यात समावेश करण्यात काहीच तोटा नसल्याचे चंद्रकुमार बोस म्हणाले.

त्याचबरोबर त्यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या बलुचींचे काय? पाकिस्तानातील अहमदियांचे काय?, असा सवाल करतानाच इतर देशांशी भारताची तुलना करू नका. सर्व देशातील जनतेसाठी भारताचे दरवाजे खुले असल्याचे ते म्हणाले. या ट्विटनंतर बोस हे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. बोस यांनी त्याचे खंडन करत भाजपमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले. आपण भाजप सोडणार नाही. पण पक्षात जर काही चुकीचे होत असेल तर ते सांगणे माझी जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे मी भेटीची वेळ मागितली होती. पण मला त्यांनी वेळ दिला नाही. भाजपच्या विजयाची पश्चिम बंगालमध्ये जेवढी संधी होती, भाजपच्या या निर्णयामुळे ती आणखी कमी झाली आहे. बंगाली लोक याचा कधीच स्वीकार करणार नाहीत. भारत काही हिंदूराष्ट्र नाही. तुम्हाला जर भारताला हिंदूराष्ट्रच बनवायचे असेल तर मग संविधानच बदला, अशी खोचक टीकाही बोस यांनी केली.

Leave a Comment