डॉमिनोजला १४ रुपयांची पिशवी पडली १० लाखांना


नवी दिल्ली – चंदीगडमधील ग्राहक विवाद निवारण आयोगाने ग्राहकांकडून पिशवीसाठी अतिरिक्त पैसे आकारल्याप्रकरणी डॉमिनोज कंपनीला दहा लाखांचा दंड ठोठावला आहे. आयोगाने हा दंड भारतामध्ये डॉमिनोजची मालकी असणाऱ्या ज्युबिलियन्ट फूड वर्क्स लिमिटेडला ठोठावला आहे.

यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार डॉमीनोजने आपल्याकडे पिशवीसाठी १४ रुपयांचे अतिरिक्त शुल्क मागितल्याची तक्रार ग्राहकाने ग्राहक आयोगाकडे केली होती. एकाच वेळी दोन्ही प्रकरणामध्ये आयोगाने सुनावणी केली. आयोगाने या प्रकरणात १० लाखांचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांना झालेला मानसिक त्रास आणि मनस्थापासाठी कंपनीने त्यांना प्रत्येकी दीड हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. तर ज्युबिलियन्ट फूड वर्क्स लिमिटेडने दंडाच्या रक्कमेतील नऊ लाख ८० हजार रुपये चंदीगडमधील गरीब रुग्णांसाठी चालवल्या जाणाऱ्या कल्याण निधीच्या खात्यावर जमा करण्यास आयोगाने सांगितले आहे.

गरीब रुग्णांच्या अन्नाची व्यवस्था चंदीगडमधील पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चमार्फत या कल्याण निधीच्या माध्यमातून केली जाते. पेशाने वकील असणाऱ्या पंकज चंगोठीया यांच्याकडून १३ नोव्हेंबर २०१९ रोजी डॉमिनोजच्या आऊटलेटमध्ये पिशवीसाठी अतिरिक्त १४ रुपयांची मागणी करण्यात आली. त्यांनी या प्रकरणी ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणात कंपनीला दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कायद्यानुसार ग्राहकांकडे पिशवीसाठी अतिरिक्त शुल्क मागण्याचा हक्क कंपन्यांना नसल्याचा युक्तीवाद पंकज यांनी केला होता.

Leave a Comment