भारतात येथे दिसणार कंकणाकृती सूर्यग्रहण


या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण येत्या २६ डिसेंबर रोजी होणार असून हे वर्षातले तिसरे पण पूर्ण सुर्यग्रहणातले पहिलेच सूर्यग्रहण आहे. भारतात सकाळी ८ व.१७ मिनिटांनी ते सुरु होईल आणि १०.५७ मिनिटांनी संपेल. वैज्ञानिकांसाठी अशी सूर्यग्रहणे निरीक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असतात कारण याच काळात सूर्याच्या वायूमंडळात होणाऱ्या हालचालींचा वेध त्यांना घेता येतो.

यापूर्वी ६ जानेवारी आणि २ जुलै रोजी खंडग्रास सूर्यग्रहणे झाली पण ती भारतातून दिसली नव्हती. आताचे कंकणाकृती किंवा वलयांकित सूर्यग्रहण द. भारतात अनेक ठिकाणी दिसणार आहे. त्याचबरोबर नेपाळ, भूतान, बांग्लादेश, पाकिस्तान, श्रीलंका, चीन ऑस्ट्रेलिया येथेही दिसणार आहे. द. भारतात या ग्रहणाचे सर्वात सुंदर दृश्य दिसेल कारण येथे कंकणाकृती ग्रहण आणि डायमंड रिंग दिसणार आहे. भारताच्या बाकी भागात खंडग्रास ग्रहण दिसणार आहे. सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी साडेतीन तासाचा आहे. विविध ठिकाणी ते वेगवेगळया वेळी सुरु होईल आणि संपेल.

पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो हे आपण जाणतो. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येऊन सुर्याला झाकतो तेव्हा सूर्यग्रहण होते. सूर्यग्रहण अमावस्येला होते. कंकणाकृती सूर्यग्रहणात चंद्र सूर्याचा ९७ टक्के भाग झाकतो. या प्रकारचे ग्रहण पृथ्वीवरून फार कमी वेळा पाहता येते. २०२० मध्ये दोन सूर्यग्रहणे होणार आहेत. पैकी पहिले २१ जून रोजी होत असून तेही भारतात दिसणार आहे. दुसरे १४ डिसेंबरला होणार असून ते प्रशांत महासागर परिसरात दिसणार आहे.

Leave a Comment