चित्रपट कथेला प्रेरणा देणारया या तुरुंगाचे होणार जतन


प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक, अभिनेते व्ही शांताराम यांच्या दो आंखे बारा हात या चित्रपटाने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पारितोषिके जिंकली होती. १९५७ साली बनलेल्या या चित्रपटाचा विसर आजही रसिकांना पडलेला नाही. या चित्रपटाचे कथानक ज्या घटनेवरून सुचले त्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तुरुंगाचे जतन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य तुरुंग विभागाने या स्वातंत्रपुरा जेलला इतिहासाचा वारसा म्हणून जतन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. या तुरुंगात एक घटना अशी घडली होती की येथून दोन कैदी फरार झाले होते मात्र काही दिवसांनी ते परत तुरुंगात आले. ते म्हणाले की पळून गेल्यावरही त्यांना सतत जेलरचे डोळे त्यांचा पाठलाग करत आहेत असेच वाटत राहिले त्यामुळे ते परत आले. ही कथा प्रसिद्ध गीतकार ग.दी. माडगुळकर यांनी व्ही शांताराम याना ऐकविली आणि त्यावरून प्रेरणा घेऊन दो आंखे बारा हातची कथा तयार झाली आणि या चित्रपटाने इतिहास घडविला.

१९३९ साली या ठिकाणी दगड, माती आणि लाकूड यांचा वापर करून आटपाडी जेलच्या ३० खोल्या बांधल्या गेल्या होत्या. त्यातील २८ खोल्यामधून कैदी आणि त्यांचा परिवार राहत असे तर उरलेल्या दोन खोल्यात जेलचे कार्यालय होते. १९५४ मध्ये या जेलमधून नामदेव आणि येडा हे दोन कैदी फरार झाले मात्र ते १५ दिवसानंतर परत आले होते. दो आंखे बारा हात हा सहा खतरनाक कैदी आणि त्यांच्यावरचा एक जेलर, खुल्या कारागृहाचा प्रयोग कसा यशस्वी करतात यावर आधारलेला चित्रपट होता.

Leave a Comment