अन्नपूर्णेश्वरी देवी- येथे कुणीही राहत नाही उपाशी


कर्नाटकातील चिकमंगळूर जवळ होरनाडू येथे भद्रावती नदी काठी असलेले प्राचीन अन्नपूर्णेश्वरी देवी मंदिर कर्नाटकातील प्राचीन मंदिरातील महत्वाचे आणि प्रसिद्ध मंदिर असून या मंदिराबाबत अशी आख्यायिका आहे की येथे येणारा कुणीही भाविक कधीच उपाशी किंवा भुकेला राहत नाही. अन्नपूर्णा याचा अर्थच मुळी अन्नाची पूर्ती करणारी असा आहे. यामुळेच घरोघरीच्या गृहिणींना अन्नपूर्णा म्हटले जाते. इतकेच नव्हे तर हिंदू विवाह संस्कारात मुलीला सासरी जाताना अन्नपूर्णा देवीची मूर्ती आवर्जून दिली जाते. या मागे घरात धान्याची लयलूट राहावी अशी भावना असते.


होरनाडूच्या या मंदिरात अन्नपूर्णेची उभी मूर्ती आहे. तिच्या हातात शंख, चक्र आणि श्रीचक्र आहे. याच मंदिरात महागणपती, अंजनेय स्वामी आणि नवग्रह पूजा केली जाते. या मंदिरात दिवसातून तीनवेळा अन्नदान होते आणि भाविकांच्या विश्रांतीची व्यवस्थाही केली जाते. या मंदिरात चमत्कारी शक्ती अनुभवास येतात असे म्हणतात. खऱ्या दिलाने जो भाविक देवीची पूजा करेल त्याच्यावर उपासमारीची वेळ कधीच येत नाही असे सांगतात.


मंदिराच्या सुंदर गोपुरम मध्ये अनेक हिंदू देवीदेवतांच्या मूर्ती असून मंडपम मंदिराच्या मुख्य मंदिराच्या डावीकडे आहे. छतावर अतिशय सुरेख नक्षीकाम केले गेले आहे. भिंतींवर अनेक मूर्ती आणि कलाकुसर केली गेली असून हे मंदिर अगस्त्य ऋषींनी स्थापले असे मानले जाते. ८ व्या शतकात त्याचा जीर्णोद्धार केला गेला असून त्याचे बांधकाम वास्तू आणि ज्योतिष शास्त्रानुसार केले गेले आहे. येथे ४०० वर्षापूर्वी धर्मकथास पुजारी प्रथा सुरु झाली ती आजतागायत सुरु आहे. म्हणजे या मंदिरात पूजेचा मान एकाच वंशाकडे आहे.

Leave a Comment