टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब करणाऱ्या शार्दुलची विराटकडून मराठीतून स्तुती


कटक – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडीजविरुद्ध अखेरच्या एकदिवसीय सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या शार्दुल ठाकूरचे मराठीतून कौतूक केले. सोशल मीडियावर त्याने एक फोटो शेअर केला असून त्याने त्या फोटोला ‘तुला मानला रे ठाकूर !’ असे मराठीतून कॅप्शन देत शार्दुलचे कौतुक केले आहे.

वेस्ट इंडिजने कटकच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात प्रथम फलंदाजी करत ३१५ धावा केल्या. त्यांच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाने कर्णधार विराट कोहली, सलामीवीर लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर हा सामना ४ गडी राखून जिंकला. पण, शार्दुल ठाकूर या सामन्यात संघासाठी तारणहार ठरला. मोक्याच्या क्षणी त्याने फटकेबाजी करत टीम इंडियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.


या सामन्यात शार्दुलने ६ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने झटपट १७ धावा केल्या. कर्णधार विराट कोहली त्याच्या या खेळीवर भलताच खुश झाला आहे. आपल्या ट्विटरवर त्याने शार्दुलसोबतचा एक फोटो टाकत, तुला मानले रे ठाकूर ! अशी मराठीतून कॅप्शन देत त्याचे कौतुक केले आहे.

दरम्यान, सलामीवीर जोडीने चांगली सुरूवात दिल्यानंतर भारताची मधली फळी कोसळली. श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि केदार जाधव झटपट माघारी परतले. तेव्हा कर्णधार विराटने मोर्चा सांभाळला. पण मोक्याच्या क्षणी तोही ८५ धावांवर बाद झाल्यामुळे भारत सामना गमावतो की काय, असे चित्र निर्माण झाले होते. तेव्हा शार्दुलने दणकेबाज खेळी केली.

Leave a Comment