गावस्कर बनले शमीचे ‘जबरा फॅन’


कटक – भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीची माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी तुलना वेस्ट इंडीजचा महान गोलंदाज माल्कन मार्शलशी केली आहे. शमीचे कौतूक करताना त्यांनी मला अनेकदा शमीमुळे वेस्ट इंडीजचा महान वेगवान गोलंदाज माल्कन मार्शलची आठवण येत असल्याचे गौरवोद्वार काढले.

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपासून मोहम्मद शमी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. या मोसमात त्याने वेग, स्विंग व उसळीच्या जोरावर प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. तर यंदा तो २०१९ मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात ४२ बळींसह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे.

वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात समालोचन करताना, गावस्कर यांना भारताचा तुमचा आवडता वेगवान गोलंदाज कोण ? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मोहम्मद शमीचे गावस्कर यांनी नाव घेतले. मला शमीमुळे माल्कम मार्शलची आठवण होते. त्याच्याबाबत विचार केला तर मला आताही गाढ झोपेत जाग येत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, वेस्ट इंडीजच्या महान वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या मार्शलसोबत तुलना झाल्यामुळे निश्चितच भारताच्या या अनुभवी वेगवान गोलंदाजाचे मनोधैर्य उंचावणार आहे.

Leave a Comment