पत्रकार जमाल खाशोगी हत्या प्रकरणात पाच जणांना मृत्यूदंड


इस्तांबुल – सौदी अरेबियाच्या न्यायालयाने पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्या प्रकरणात पाच आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. इस्तांबुलमधील सौदी अरेबियाच्या दूतावासात मागील वर्षी जमाल खाशोगी यांची सौदीच्या एजंटन्सनी हत्या केली होती. वॉशिंग्टन पोस्ट वर्तमानपत्रात जमाल खाशोगी स्तंभलेखक होते. याच प्रकरणात आणखी तीन आरोपींना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सर्व दोषींना निकालाविरोधात पुन्हा दाद मागता येऊ शकते. सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स महंमद बिन सलमान यांच्यावर खाशोगी यांच्या हत्येवरुन चौफेर टीका झाली. कारण या हत्येमध्ये गुंतलेले एजंटन्स थेट महंमद बिन सलमान यांच्यासाठी काम करायचे. खाशोगी यांची हत्या क्राऊन प्रिन्सच्याच निर्देशावरुन झाल्याचा आरोप करण्यात येत होता.

या हत्येशी महंमद बिन सलमान यांचा काहीही संबंध नाही. याबद्दल त्यांना काहीही माहित नसल्याचे अनेकवेळा सौदी अरेबियाकडून स्पष्ट करण्यात आले होते. सौदी अरेबियाच्या इस्तांबूल येथील दूतावासाच्या कार्यालयात दोन ऑक्टोबर रोजी जमाल खाशोगी यांची हत्या करण्यात आली होती. पण महिन्यानंतरही खाशोगी यांच्या मृतदेहाचे अवशेष सापडले नाहीत. खाशोगी यांना ते दूतावास कार्यालयात आल्यानंतर गळा आवळून हत्या करण्यात आल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते अॅसिडमध्ये टाकून विरघळवण्यात आले होते.

Leave a Comment