बिगबी राष्ट्रीय पुरस्कार सोहोळ्याला अनुपस्थित राहणार


सोमवारी म्हणजे आज राजधानी दिल्लीत साजऱ्या होत असलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहोळ्याला बिग बी उपस्थित राहू शकणार नाही. या सोहळ्यात अमिताभ बच्चन यांना चित्रपटसृष्टीतील मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जाणार होता मात्र रविवारी अमिताभ यांनी ट्विटरवरून त्यांची तब्येत बरी नसल्याने आणि डॉक्टरनी प्रवासास परवानगी दिली नसल्याने या पुरस्कार सोहळ्यास हजर राहू शकत नाही या बद्दल खेद व्यक्त केला आहे. बिग बी म्हणतो या पुरस्काराला येऊ शकत नाही ही माझ्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे आणि त्याबद्दल खूप वाईट वाटते आहे.

सोमवारी राष्ट्रीय पुरस्कार उपराष्ट्रपती वैन्कैया नायडू यांच्या हस्ते प्रदान केले जात आहेत. यावेळी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी हे पुरस्कार ३ मे रोजी दिले जातात मात्र यंदा लोकसभा निवडणुकांमुळे ते स्थगित केले होते. हे पुरस्कार २०१९ साठीचे असून त्यात बिग बी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला होता तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आयुष्मान खुराणा याला अंदाधूनसाठी तर विकी कौशल याला उरी द सर्जिकल स्ट्राईक साठी विभागून दिला गेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश हिला जाहीर झाला होता.

गेले काही दिवस अमिताभ बच्चन यांची प्रकृती नरम असून काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले होते मात्र रुग्णालयातून बाहेर येताच विश्रांती न घेता अमिताभ यांनी कामाला सुरवात केली होती. ७७ वर्षीय अमिताभ यांनी नुकतेच स्लोवाकिया येथे प्रचंड थंडीत चेहरे या त्यांच्या आगामी चित्रपटाचे शुटींग पूर्ण केले असून आजारपणामुळे ऑक्टोबर पासून त्यांचे वजन ५ किलो कमी झाल्याचेही त्यांनी ट्विटरवर शेअर केले आहे.

Leave a Comment