पाकिस्तानच्या कराची मधले प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिर


कलियुगात भाविकांच्या प्रार्थनेला सर्वात जलद पावणारी देवता अशी ख्याती असलेला देव म्हणजे बजरंगबली हनुमान. हिंदू पुराणात जे सात चिरंजीव मानले जातात त्यात हनुमान हे एक आहेत आणि त्यामुळे आजही त्यांचा पृथ्वीवर संचार सुरु असतो असा भाविकांच्या विश्वास आहे. भारतात प्रत्येक गावात किमान एक हनुमान मंदिर आहेच पण परदेशातही अनेक ठिकाणी हनुमान मंदिरे पाहायला मिळतात. पाकिस्तानच्या कराची शहरात सोल्जर बाजारात असेच एक प्राचीन हनुमान मंदिर असून त्याला पंचमुखी हनुमान मंदिर असे म्हटले जाते.


हे मंदिर १५०० वर्षापेक्षा अधिक जुने आहे आणि मंदिरात पाचमुखी मारुतीची मूर्ती विराजमान आहे. असे म्हणतात ही मूर्ती स्वयंभू आहे. या मूर्तीमध्ये हनुमानाची सर्व रूपे आहेत. त्यात नरसिंह, आदिवराह, हयग्रीव, हनुमान आणि गरुड यांचा समावेश आहे. असाही विश्वास आहे की या जागी प्रत्यक्ष भगवान राम आले होते. या मंदिरात श्रद्धेने १०८ प्रदक्षिणा घातल्या तर सर्व दुःखे, समस्या नष्ट होतात.

या मंदिराचा इतिहास जुना आहे. अर्थात आज उभे असलेले मंदिर १८ व्या शतकात जीर्णोद्धार केलेले आहे. आजही येथे देखभाल आणि दुरुस्तीची कामे सुरूच आहेत. पाकिस्तान मध्ये आज घडीला जी काही हिंदू मंदिरे आहेत त्यातील हे एक महत्वाचे मंदिर मानले जाते. मराठी, सिंधी, बलुची असे सर्व धर्माचे लोक येथे दर्शनाला येतात. मंदिरातील हनुमान मूर्ती १७ लाख वर्षे जुनी आहे असाही दावा केला जातो.

Leave a Comment