देशात कोणतेही डिटेंशन सेंटर नाही, शहरी नक्षली अफवा पसरवत आहेत – मोदी

(Source)

भारतात कोणतेही डिटेंशन सेंटर नाही व कोणत्याही मुस्लिमांना देशात पकडले जाणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना रामलीला मैदानावर त्यांनी रॅली घेतली, यावेळी ते बोलत होते.

काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष – शहरी नक्षली मुस्लिमांना डिटेंशन सेंटरमध्ये पाठवले जाईल, अशी खोटी माहिती पसरवत आहेत. तुमच्या शिक्षणाचा आदर करा आणि एकदा नागरिकत्व दुरूस्ती कायदा वाचा, अशा शब्दात मोदींनी विरोधकांवर हल्ला चढवला.

नरेंद्र मोदी म्हणाले की, भारतीय मुस्लिमांचे नागरिकत्व कायदा आणि एनआरसीशी काहीही देणेघेणे नाही. भारतीय मुस्लिमांना कोणीही डिटेंशन सेंटरमध्ये पाठवणार नाही व भारतात कोणतेही डिटेंशन सेंटर देखील नाही. या खोटारडेपणामुळे देशाचे विभाजन होत आहे.

देशातील युवकांना आवाहन करत मोदी म्हणाले की, कोणत्याही खोट्या अफवांना बळी न पडता, एकदा नागरिकत्व कायदा वाचा. हा कायदा कोणत्याही भारतीयाचे नागरिकत्व काढून घेत नाही. यामुळे केवळ नवीन शरणार्थींना फायदा होणार नाही.

आपल्या भाषणात नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, मनमोहन सिंह संसदेत म्हणाले होते की, बांग्लादेशमध्ये धार्मिक छळ झालेल्यांना देखील नागरिकत्व दिले पाहिजे.

मोदींच्या भाषणानंतर काँग्रेसने देखील ट्विट करत उत्तर दिले. काँग्रेसने ट्विटमध्ये लिहिले की, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह काय म्हणाले ते नीट ऐका. शेजारील देशातील अल्पसंख्यांकाना धार्मिकतेच्या आधावर नागरिकत्व द्यावे असे ते ऐकदा तरी म्हणाले का ? ते म्हणाले की शरणार्थींकडे उदार दृष्टीने पाहणे गरजेचे आहे.

Leave a Comment