इंटरनेट बंदीनंतर या ऑफलाईन चॅट अ‍ॅप्सचा वापर करत आहेत युजर्स

(Source)

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरात अनेक ठिकाणी प्रदर्शन सुरू आहे. त्यामुळे अनेक शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अशावेळी ब्रिजफाय, फायर-चॅट सारख्या ऑफलाईन मेसेजिंग अ‍ॅप्सचा वापर वाढला आहे. चीन विरोधात हाँगकाँगमध्ये झालेल्या विरोध प्रदर्शनानंतर देखील आंदोलकांनी देखील या अ‍ॅप्सचा मोठा वापर केला होता, कदाचित तेथूनच प्रेरणा घेऊन आता भारतातही या अ‍ॅप्सचा वापर वाढला आहे.

या दोन्ही अ‍ॅपने कमी अंतरावरील ब्लूटूथ कनेक्शनच्या मदतीने संदेश पाठवता येतात. अमेरिकन अ‍ॅप कंपनी अ‍ॅपोटॉपियाचे आकडे सांगतात की, 12 डिसेंबरला आसाम आणि मेघालयामध्ये इंटरनेट बंद केल्यापासून ब्रिजफाय अ‍ॅप डाउनलोड आणि त्याच्या वापरामध्ये 80 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दोन्ही राज्यानंतर इतर राज्यांमध्ये इंटरनेट बंद करण्यात आल्यानंतर तेथेही या अ‍ॅप्सचा वापर अधिक वाढला आहे.

इंटरनेट बंदी आधी देशात ब्रिजफाय सरासरी 25 वेळा डाउनलोड होत असे. तर 13 डिसेंबरपासून त्यात 100 पट वाढ झाली आहे. हा आकडा दरदिवशी 2,609 डाउनलोडवर पोहचला आहे. एक्टिव युजर्समध्ये देखील 65 पट वाढ झाली आहे. दिल्लीच्या काही भागात इंटरनेट बंदीनंतर अ‍ॅपच्या वापरात 30 पटींनी वाढ झाली आहे.

ब्रिजफायने आपल्या ट्विटर अकाउंटवर सांगितले की, भारतातील त्यांचे ट्रॅफिक वाढले आहे. त्यांनी सांगितले की, कंपनी अधिक वेगाने मेसेज ट्रांसफर करण्यासाठी युजर्सची मदत करत आहे. तसेच 17 ते 18 डिसेंबरच्या मध्ये फायर-चॅट अ‍ॅपच्या डाउनलोडमध्ये 18 पटींनी वाढ झाली आहे. या अ‍ॅपचे युजर कमी आहेत. मात्र प्रदर्शन व इंटरनेट बंदीनंतर यात वाढ होऊ शकते.

Leave a Comment