आता आर्टिफिशिअल इंटेलिजेंसद्वारे ब्लड कॅन्सरचा शोध घेणे शक्य

(Source)

आर्टिफिशिअल इंटेलिजेंसच्या (एआय) मदतीने ब्ल्ड कॅन्सरचा प्रकार असलेला एक्युट म्येलॉइड ल्यूकेमियाची (एएमएल) लक्षणे शोधता येणे शक्य झाले आहे. एका रिसर्चमध्ये ही माहिती समोर आली आहे.

आयसायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, रक्तातील पेशींच्या जनुक क्रियेच्या अभ्यासावरून लवकरात लवकर या आजारावर उपचार घेणे शक्य होईल. ल्यूकेमियाची सुरूवातीची लक्षणे ही एखाद्या सर्दीसारखी असू शकतात. ल्यूकेमिया हा घातक असून, त्यावर लवकरात लवकर उपचार घेण्याची गरज असते.

जर्मन सेंटर फॉर न्युरोडीजेनेरेटिव्ह डायझिस येथील या रिसर्चचे प्रमुख जोओकिम स्लट्झे म्हणाले की, आमच्या अभ्यासानुसार, रक्त तपासणीनंतर कौटुंबिक डॉक्टर देखील ल्यूकेमियाच्या लक्षणांबद्दल माहिती देऊ शकतात.

ते म्हणाले की, लक्षणांची माहिती मिळाल्यावर रुग्ण स्पेशालिस्टची भेट घेऊ शकतो. त्यामुळे आतापेक्षा अधिक जलद यावर उपचार घेता येतील. या संशोधनासाठी संशोधकांनी खास ट्रांसक्रिप्टोमवर लक्ष केंद्रीत केले. ट्रांसक्रिप्टोम हे जनुकांच्या क्रियेंचा एक ठसा आहे.

या संशोधनासाठी हजारो रक्तांच्या पेशींचा अभ्यास करण्यात आला. जोओकिम म्हणाले की, पेशींच्या अवस्थेबद्दल महत्त्वपुर्ण माहिती ट्रांसक्रिप्टोममध्ये असते. सध्याची निदान प्रक्रिया वेगवेगळ्या डेटांवर आधारित आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा वापर करून ट्रांसक्रिप्टोमचे विश्लेषण केल्यावर काय निष्कर्ष निघतो हे महत्त्वाचे होते.

या संशोधनासाठी 12000 पेक्षा अधिक रक्ताचे नुमन्यांचा अभ्यास करण्यात आला. यातील जवळपास 4,100 रक्ताचे नमूने ल्यूकेमियाने ग्रस्त व्यक्तींचे होते. तर इतर नमुने हे दुसरे आजारी रुग्ण व निरोगी व्यक्तींचे होते.

या नमुन्यांमध्ये अल्गोरिद्मच्या साहय्याने कोणते ल्यूकेमिया ग्रसित आहेत व कोणते नाही याची माहिती मिळते.

Leave a Comment