ही चार शक्तीपीठे आजही अज्ञात


हिंदू धर्मग्रंथ, पुराणात देवीची शक्तीपीठे वर्णन केली गेली आहेत. शिवपत्नी सती हिने शिवाला दक्ष राजाने म्हणजे तिच्या पित्याने समारंभाला बोलावले नाही म्हणून यज्ञात उडी घेऊन स्वतःला जाळून घेतले होते. तेव्हा शिवाने तिचा देह खांद्यावर घेऊन तांडव केल्याचे पुराणे सांगतात. यावेळी विष्णूने त्याच्या चक्राने सतीच्या देहाचे तुकडे केले आणि जेथे जेथे सतीच्या अवयवांचे तुकडे किंवा तिचे दागिने पडले ती शक्तीपीठे म्हणून मान्यता पावली. भारतीय महाद्विपात देवी भगवतीची १०८ शक्तीपीठे वर्णन केली आहेत तर देवी गीता पुराणात ७२ शक्तीपीठे वर्णन केली गेली आहेत. देवी पुराणात ५२ शक्तीपीठे आहेत, तीच आज सर्वमान्य आहेत.

विशेष म्हणजे यात वर्णन केलेली चार शक्तीपीठे आजही अज्ञात आहेत. त्यांचे वर्णन पुराणात मिळते पण स्थान नक्की कोणते याचा उलगडा होत नाही. ती शक्तीपीठे अशी आहेत. त्यातील पहिले आहे रत्नावली. या ठिकाणी देवी सतीचा खांदा पडला होता असे मानले जाते. हे ठिकाण चेन्नई जवळ कुठेतरी आहे पण ते नक्की कुठे हे सिध्द करता आलेले नाही. दुसरे आहे लंका शक्तीपीठ. येथे देवी सतीचा दागिना पडला होता असा समज आहे. कुठला दागिना आणि नक्की कोणते स्थान याबद्दल कोणतीच माहिती मिळत नाही.

तिसरे स्थान आहे पंचसागर शक्तीपीठ. येथे देवी सतीचा खालचा जबडा पडला होता. शास्त्रात याचा उल्लेख आहे पण ते स्थान नक्की कोणते हे कळत नाही. चौथे स्थान आहे कालमाधव शक्तीपीठ- या ठिकाणी देवी सतीचा डावा कुल्ला पडला होता असे मानतात. या ठिकाणी देवीला कालमाधव तर शिवाला आसीतानंद या नावाने ओळखले जाते. हे ठिकाण नक्की कुठे आहे याचे उल्लेख सापडत नाहीत.

Leave a Comment