या उपायांनी दूर करा ओठांचा काळसरपणा


ओठ काळसर पडण्यामागे अनेक कारणे असू शकतात. असंतुलित आहार, पिग्मेंटेशन, खूप वेळ उन्हामध्ये वावरणे, हलक्या प्रतीची प्रसाधने, विशेषतः हलक्या प्रतीची लिपस्टिक वापरणे, अश्या कितीतरी कारणांमुळे ओठ काळसर पडू शकतात. पण काही साध्या उपायांचा अवलंब केल्यास ओठांचा रंग पुन्हा पूर्ववत होण्यास सहाय्य मिळते.

रात्री झोपण्यापूर्वी थोड्या मधाने ओठांवर हलक्या हाताने मसाज करावा. हे मध रात्रभर ओठांवर तसेच राहू द्यावे. मधाचा वापर आपल्या आहारामध्येही नियमित करावा. मधात अँटी ऑक्सिडंट्स व मॅग्नेशीयम हा क्षार भरपूर प्रमाणात असल्यामुळे ओठांना मृदुता प्राप्त होऊन, त्यांचा काळसरपणा दूर करण्यास मध उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे टोमॅटोही ओठांचा काळसरपणा दूर करण्यासाठी उत्तम आहेत. यामध्ये असलेले सेलेनियम सूर्याच्या प्रखर उन्हापासून ओठांचे रक्षण करते. टोमॅटोचा वापर आपल्या आहारामध्ये तर करावाच, शिवाय उन्हामधून फिरून आल्यानंतर त्वरित टोमॅटोची पेस्ट ओठांवर लावावी. असे केल्याने, उन्हामुळे ओठांवर आलेला काळसरपणा दूर होतो.

आपण दिवसभरात अनेकदा चहा किंवा कॉफी घेत असतो. पावसाळ्यात किंवा थंडीच्या मोसमात तर चहा किंवा कॉफी पिण्याचे प्रमाण अजूनच वाढते. पण चहा किंवा कॉफीच्या अति सेवनाने देखील ओठ काळसर दिसू शकतात. त्यामुळे दिवसातून अनेकदा चहा किंवा कॉफी घेण्यापेक्षा, ग्रीन टी च्या सेवनाचे प्रमाण वाढवा. ग्रीन टी मध्ये असलेले पॉलिफेनॉल्स शरीरातील फ्री रॅडीकल्स कमी करून, उन्हामुळे किंवा चहा – कॉफी च्या अतिसेवनाने काळसर पडलेले ओठ पुन्हा पूर्ववत करण्यास मदत करतात. ग्रीन टी च्या टी-बॅग्स थोड्याशा पाण्याने ओलसर करून घेऊन, त्याने ओठांवर हलक्या हाताने मसाज केल्यासही ओठांचा काळसरपणा दूर होण्यास मदत मिळते, तसेच ओठ मऊ राहतात.

आपल्या आहारात नारळाचा समावेश अवश्य करा. हे आपल्याला निरनिराळ्या प्रकारे करता येईल. नारळाचे पाणी प्या, त्याचे ताजे खोबरे भाज्यांवर किंवा गरमागरम पोहे, उपमा, खिचडीवर घालून खा, किंवा कुठल्याही भाजीच्या ग्रेव्हीमध्ये नारळाचे दूध वापरा. नारळाचे तेलही स्वयंपाकामध्ये वापरता येऊ शकेल. नारळाच्या सेवनाने त्वचा नितळ राहते. नारळाचे तेल दररोज ओठांना लावल्यास ओठ गुलाबी व मऊ राहतील.

आक्रोडमध्ये असलेले ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स त्वचेमधील कोलाजेन वाढविण्यास सहाय्य करतात. त्वचेमध्ये कोलाजेन चे प्रमाण वाढल्याने त्वचा लवचिक होते. अक्रोडाची जरा जाडसर पेस्ट बनवून त्याने ओठांवर हलक्या हाताने मसाज करावा. असे केल्याने ओठांच्या त्वचेवरील मृत पेशी निघून जाऊन ओठांचा काळसर पडलेला रंग हलका होण्यास मदत होईल. तसेच दह्याच्या वापराने त्वचा नितळ होऊन त्यावरील सुरकुत्या नाहीशा होण्यास मदत मिळते. त्यामुळे आपल्या आहारामध्ये दह्याचा समावेश अवश्य करावा. दह्यामध्ये थोडेसे केशर घालून त्याने ओठांचा मसाज केला असता, ओठांवरील पिग्मेंटेशनमुळे आलेला काळसरपणा दूर होण्यास मदत मिळेल.

आपल्या शरीरामधील अॅसिड्स व तीव्र अल्कलींमुळे ओठ काळसर पडू शकतात. गरम पाण्यामधून लिंबाचा रस घेतल्याने शरीरामधून ही अॅसिड्स व अल्कली बाहेर टाकण्यास मदत मिळते. लिंबू हे अत्यंत प्रभावी ब्लीच आहे. थोडीशी साखर एका लिंबाच्या लहान फोडीवर घालून त्याने ओठ चोळल्यास ओठांचा काळसरपणा दूर होतो. त्याचप्रमाणे अॅलो व्हेरा किंवा कोरफड, ओठांचा काळसरपणा दूर करण्यास उपयुक्त आहे. अॅलो व्हेराच्या रसाचा समावेश आपल्या आहारात करावा आणि त्याच्या गराने ओठांवर नियमित मसाज करावा. या उपायाने ओठांचा काळसरपणा दूर होऊन ओठ पुनश्च गुलाबी व मृदू होतील.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment