आयएसआयला पाणबुडयांच्या लोकेशन्सची माहिती देणाऱ्या सात नौसैनिकांना अटक


नवी दिल्ली – आंध्रप्रदेश पोलिसांनी शुक्रवारी नौदलाच्या सात नौसैनिकांना आणि मुंबईतील एका हवाला ऑपरेटरला पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपावरुन अटक केली आहे. या आठजणांना देशाच्या वेगवेगळया भागातून अटक करुन विजयवाडा येथील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ३ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने हे दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार ‘ऑपरेशन डॉल्फिन नोज’ केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि भारतीय नौदलाच्या गुप्तचर विभागाच्या समन्वयातून राबवण्यात आले. ही कारवाई त्या अंतर्गत करण्यात आली असून २०१८ च्या मध्यापासूनच भारतीय जहाजे आणि पाणबुडयांविषयी गोपनीय माहिती विशाखापट्टणम, मुंबई आणि कारवार येथील नौदलाच्या तळावर तैनात असणारे हे नौसैनिक आयएसआयच्या एजंटसना देत होते.

ही माहिती या प्रकरणाच्या तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली. हे रॅकेट जितके दिसते, त्यापेक्षा मोठे असू शकते. याबद्दल अधिक माहिती हवाला ऑपरेटरला असू शकतो. त्यामुळे याची सखोल चौकशी आवश्यक असल्याचे आंध्र प्रदेश पोलिसांच्या गुप्तचर विभागातील सूत्रांनी सांगितले. केंद्रीय यंत्रणा आणि नौदलाच्या गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने आंध्र प्रदेश पोलिसांच्या गुप्तचर विभागाने मिळून हे ऑपरेशन केले.

हे नौसैनिक २०१७ सालच्या सुरुवातीला सेवेत रुजू झाले होते. नौदलात रुजू झाल्यानंतर वर्षभरात तीन ते चार महिलांनी त्यांच्याशी संपर्क साधला व आपल्या जाळयात ओढले. एका बिझनेसमॅन बरोबर या महिलांनी त्यांची ओळख करुन दिली. आयएसआयचा तो एजंट होता. भारतीय नौदलाच्या युद्धनौका, पाणबुडया समुद्रात कुठल्या ठिकाणी उभ्या आहेत. त्यांचा प्रवासमार्ग कसा असेल याविषयी गोपनीय माहिती हा एजंट मिळवायचा. या नौसैनिकांना त्या बदल्यात हवाला ऑपरेटरमार्फत भरपूर पैसा मिळत होता. या कटाचे हँडलर आणि त्या महिलांपर्यंत अद्याप पोलीस पोहोचलेले नाही.

Leave a Comment